Thursday, September 19, 2024
Homeनगरभोजापूरच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्ता रोको

भोजापूरच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्ता रोको

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर भोजापूर धरणाच्या पूर पाण्याच्या मागणीसाठी भोजापूर पाटपाणी पुनर्निर्माण संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (दि. 12) सकाळी दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या नेत्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. आंदोलनात वंचित लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भोजापूर धरणाचे हक्काचे पूर पाणी तळेगाव दिघे भागातील तिगाव माथ्यापर्यंत प्राधान्याने मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी करीत ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात वंचित लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे रस्त्याच्या चौतर्फा वाहनांच्या दूरवर रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनास भाजप-शिवसेना पक्ष आणि भूमिपुत्र संघटनेने पाठिंबा दिला.

भोजापूर पाटपाणी पुनर्निर्माण संघर्ष समितीच्यावतीने संगमनेर-कोपरगाव व लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावरील तळेगाव दिघे चौफुलीवर छेडण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी नेते किसन चत्तर, गणेश दिघे, साहेबराव नवले, अमोल खताळ, प्रकाश सानप, विनोद नाटे, वैभव लांडगे, सुनील दिघे, विठ्ठल घोरपडे, पंढरीनाथ इल्हे, बाळासाहेब दिघे, भीमराज चत्तर, शिवाजी दिघे, डॉ. आर. पी. दिघे, रमेश दिघे, संजय दिघे, राजेंद्र सोनवणे, रामदास दिघे, दत्तात्रेय दिघे, अमोल दिघे आदी लाभधारक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

तब्बल 45 वर्ष लाभधारक शेतकर्‍यांना भोजापूरच्या पूर पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनात शेतकरी नेते किसन चत्तर यांनी पाटबंधारे विभागाच्या उपस्थित अधिकार्‍यांना भोजापूर पाणीप्रश्नी धारेवर धरत अनेक प्रश्न विचारत फैलावर घेतले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी के. के. बिडगर, नाशिक जलसंपदा विभागाचे उपअभियंता सुभाष पगारे, जलसंधारण अधिकारी एस. एस. मंडलिक उपस्थित होते.

पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पूर पाणी सर्वप्रथम पूर चार्‍यांना सोडण्यात येईल, संगमनेर तालुक्याच्या वाट्याचे 35 टक्के पूर पाणी प्राधान्याने देण्यात येईल, यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचे पुनर्विलोकन करण्यात येईल आणि भोजापूर पूर चारीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यांनतर तब्बल दोन तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या