Thursday, May 2, 2024
Homeजळगावमध्य रेल्वेने केला प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश

मध्य रेल्वेने केला प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश

भुसावळ – Bhusaval – प्रतिनिधी :

आशियातील पहिली रेल्वे भारतातील मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. भारतीय रेल्वेने 5 रोजी आपल्या प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

आशियातील (भारतातील) पहिली गाडी मुंबई आणि ठाणे दरम्यान शनिवारी, 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:35 वाजता धावली. त्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

बोरी बंदर येथून निघणार्‍या स्थानकांत लोकांचा जमाव होता, किल्ल्याच्या तटबंदीवरून बॅन्ड वाजविण्यात आला.

गनमधून गोळ्या उडविण्यात आल्या, सिग्नल झाल्यावर जेव्हा छोटी गाडी तीन इंजिनांसह लहान लाकडी स्थानकातून बाहेर पडली तेव्हा भारतातील रेल्वे युगाची पहाट झाली.

जसजशी वर्षे गेली तसतसे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार झाला. सन 1900 साली जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये, भारतीय मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाले.

त्याच्या सीमांचा उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेकडे नागपूर तर दक्षिण-पूर्वेत रायचूरपर्यंत विस्तार करण्यात आला. अशाप्रकारे, मुंबई येथून भारताच्या जवळ जवळ सर्व भागात संपर्क तयार करण्यात आला. जीआयपीचा मायलेज रेल्वेमार्ग 1600 होता. (2575 किमी).

दि. 5 नोव्हेंबर 1951 रोजी, निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि धौलपूर राज्य रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना जीआयपी रेल्वेने केली. मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे नेटवर्कने मुंबई शहराच्या सामाजिक-आर्थिक वाढीसाठी अग्रगण्य भूमिका बजावली आहे. आणि भारतातील द्रुतगती परिवहन प्रणालीच्या आगमनाची नोंद देखील केली आहे.

त्यानंतर मध्य रेल्वेने बरीच प्रगती केली आणि आता त्याचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून 4151.93 किमीचे जाळे आहे. मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरी नेटवर्क हे दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.

ऑक्टोबर 1966 मध्ये मध्य रेल्वेतील सोलापूर विभाग आणि दक्षिण रेल्वेतील सिकंदराबाद, हुब्बळी, विजयवाडा या विभागांना विलीन करून दक्षिण मध्य रेल्वे या आणखी एका रेल्वेची स्थापना, करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1977 रोजी सोलापूर विभाग रेल्वेमध्ये विलीन झाला आणि दक्षिण रेल्वेतील गुंटकल विभाग दक्षिणमध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला.

त्यानंतर 2003 मध्ये, आणखी सात झोन तयार करण्यात आले, ज्यात मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि भोपाळ विभागांचा पश्चिम मध्य रेल्वेमध्ये समावेश करण्यात आला आणि मध्य रेल्वेचा झाशी विभाग उत्तर-मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला.

आज मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत ज्यामध्ये मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर, पुणे या विभागांत 466 स्थानकांचे नेटवर्क आहे.

सध्या कोरोना साथीच्या विरोधात लढा देताना मध्य रेल्वे देशाच्या विविध भागात पुरवठा साखळी सुनिश्चित करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. प्रवाशांची आणि रेल्वे कुटुंबाची संरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कटीबद्ध आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या