Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये ’भुजबळां’चा आशीर्वाद कुशवाह यांना

बिहारमध्ये ’भुजबळां’चा आशीर्वाद कुशवाह यांना

नाशिक । कुंदन राजपूत

बिहार विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर फुटणार असले तरी दोन मराठी नावांची तेथे जोरदार चर्चा आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून घोषणा होणे बाकी आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची ताकद कोणामागे याबाबत चर्चा रंगत आहे. भुजबळ यांनी राष्ट्रिय लोक समता पार्टिचे उपेंद्र कुशवाह यांना पाठिंबा दिला असून महागठबंधनमध्ये राहून ’लालटेन’च्या उजेडात निवडणुकिला समोरे जाणार आहे.

बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे राजकारण तापले आहे. तेथे एनडीए विरुध्द महागठबंधन अशी सरळ लढत होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए निवडणुकिला सामोरे जात आहे.

तर राजदचे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात कॉग्रेस व कुशवाह यांची समता पार्टी महागठबंधन म्हणून निवडणूक लढवत आहे. करोनापेक्षा जागा वाटपाची तेथे जादा चर्चा आहे. भुजबळ हे समता परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष असून बिहार, झारखंड यांसह उत्तरेकडील राज्यात त्यांचे नेटवर्क आहे.

सात वर्षांपुर्वी भुजबळ यांनी झारखंड येथे समता परिषदेचा राष्ट्रिय मेळावा घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. 2014 लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांनी त्यांचा आशीर्वाद कुशवाह यांना दिला होता. तेथे राष्ट्रिय लोक समता पार्टीचे स्वबळावर तीन खासदार व विधानसभेला दोन आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रात जसा माळी समाज तसा बिहारमध्ये कुशवाह समजले जातात.

उपेंद्र कुशवाह आता ‘एनडीए’शी फारकत घेऊन महागठबंधनमध्ये सहभागी झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत समता परिषदेची ताकत कोणाच्या मागे ही चर्चा होती. मात्र, भुजबळ यांनी कुशवाह यांना आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे.

एवढेच नव्हे तर करोनाची परिस्थिती सामान्य झाल्यास भुजबळ बिहार निवडणुकीत प्रचारसभेला देखील जाऊ शकतात. ते बघता निवडणुकीच्या भोजपुरी तडक्यात मराठी मुलूख मैदान तोफा धडाडताना पहायला मिळू शकते.

राष्ट्रवादी विरोधात उमेदवार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेवेळी पवार यांच्या सोबत आलेले तारिक अन्वर पुन्हा स्वगृही परतले आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीकडे चेहरा नसून संघटन कमकुवत झाले आहे.महागठबंधनमध्ये राष्ट्रवादीला जागा न दिल्यास ते स्वतंत्र निवडणूक लढवू शकतात. अशा वेळी राष्ट्रवादी विरुध्द उमेदवार देणे टाळले जाईल, असे समता परिषदेकडून सांगण्यात आले.

बिहार निवडणुकीत आमची ताकद उपेंद्र कुशवाह यांच्या समता पार्टीमागे असणार आहे. महागठबंधनमध्ये राहून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादी महागठबंधनमध्ये नसल्यास त्यांच्याविरुध्द उमेदवार देणे टाळू. प्रचार सभेला जाणे हे करोना परिस्थिती व प्रकृतीवर अवलंबून आहे.

– छगन भुजबळ, अन्न पुरवठा मंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रिय समता परिषद

- Advertisment -

ताज्या बातम्या