श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मोटारसायकलसह दहा मोबाईल चोरणार्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख ऊर्फ चपट्या शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 1 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर नवले यांच्या फिर्यादीवरून 9 डिसेंबरच्या रात्री रेव्हेन्यू कॉलनी कॉलेजरोड, श्रीरामपूर येथून होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहते घरासमोरुन चोरुन केल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल होताच पोलीस नितीन देशमुख यांनी तपास पथकास गाडीचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी शाहरुख उर्फ (चपट्या) अफसर शेख (वय 30) याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता. सदर आरोपी हा दि. 16 डिसेंबर रोजी श्रीरामपूर बस स्टॅण्ड परिसरात आला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच त्याने श्रीरामपूर बसस्टॅण्ड येथून वेळोवेळी दहा मोबाईल चोरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. बसवराज शिवपूंजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोहेका मच्छिंद्र शेलार, पो.ना शरद अहिरे, पोलीस कॉस्टेबल संभाजी खरात, अजित पटारे, सुशिल होलगीर, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, आजिनाथ आंधळे, सचिन दुकळे. रामेश्वर तारडे, मिरा सरग यांनी केली. पुढील तपास मच्छिंद्र शेलार हे करत आहेत.