Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर तालुका पोलिसांच्या आशिर्वादाने बायोडिझेलची विक्री

नगर तालुका पोलिसांच्या आशिर्वादाने बायोडिझेलची विक्री

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहराजवळून जाणार्‍या महामार्गालगत पुन्हा अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याचा प्रकार विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला. नगर तालुका पोलिसांच्या आशिर्वादाने नगर- पुणे महामार्गावरील कामरगाव (ता. नगर) शिवारात कारवाई करून बायोडिझेल, विक्री करण्यासाठीचे साहित्य व वाहने असा सुमारे 29 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार लाख 75 हजार 410 रुपये किंमतीचे सहा हजार 95 लिटर बायोडिझेल मिळून आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ मुरलीधर बळी (वय 47 रा. भाजी मार्केटच्या पाठीमागे, सारसनगर), कृष्णा ताराचंद राऊत (वय 25 रा. झोपडी कॅन्टींग शेजारी, सावेडी), खंडु काकासाहेब गोरडे (वय 23 रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), देवीदास जाधव व भरत कांडेकर (दोन्ही रा. नगर, पूर्ण नावे माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जाधव व कांडेकर पसार झाले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी पथक नियुक्त केले आहे.

हे पथक कधीतरी नगर शहरासह जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी येत असते. या पथकाने शनिवारी (दि. 26) रात्री साडे दहाच्या सुमारास महामार्गालगत सुरू असलेल्या कामरगाव शिवारातील बंद पडलेले हॉटेल यशच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीवर छापा टाकला. सहा हजार 95 लिटर बायोडिझेल, विक्री करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व बायोडिझेल भरण्यासाठी आलेली वाहने असा सुमारे 29 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत.

‘त्या’ ‘पंटर’कडून वसुली

नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीवर छापेमारी केली. नगर तालुका पोलिसांच्या आशिर्वादाने याठिकाणी ही विक्री सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही. अशा अनेक ठिकाणी बायोडिझेल विक्री सुरू असून त्याला नगर तालुका पोलिसांचा आशिर्वाद असल्याचे दिसून येते. एलसीबीतून बदली होऊन नगर तालुका पोलीस ठाण्यात गेलेला साहेबांचा खास ‘पंटर’ अवैध धंद्यांची वसूली करत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या