Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजबाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर

बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui’s) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या (Murder) केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर गोळीबार (Shot) करण्यात आला. या घटनेनंतर तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी (Police) अटक केली असून एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र, अशातच आता या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यापैकी एक आरोपी हा हरियाणातील तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याचे बोलले जात आहे. तर एक जण अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथके उज्जैन (मध्यप्रदेश), हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली असल्याची माहिती आहे. या तिघांनी दोन बंदुकीतून बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. तसेच बिश्नोई गँगने (Bishnoi Gang) सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींची हत्या का आणि कशासाठी? धक्कादायक कारणं समोर

तसेच बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या तीन जणांपैकी दोघांची ओळख पोलिसांना (Police) पटली आहे. यातील एका आरोपीचे नाव करनैल सिंह असे असून तो हरियाणातील आहे. तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून धर्मराज कश्यप असे त्याचे नाव आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षाने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या तिघांनाही चौथा व्यक्ती मार्गदर्शन करत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा चौथा आरोपी मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे.

आरोपींकडून काही दिवसांपासून घरासह कार्यालयाची रेकी

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कट रचण्यात येत होता. त्यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकीही करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी एका बाईकवरुन येत बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

बाबा सिद्दिकींवर आज अंत्यसंस्कार

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाणार आहे. आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल. मात्र या आधी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह, अनेक राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येईल. रात्री ७ वाजता ही प्रार्थना त्यांच्या मकबा हाईट या राहत्या घरी होईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या