श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तुम्ही लोकांच्या घराचे कुलूप का तोडता, त्याने लोकांचे नुकसान होते, असे म्हणाल्याचा राग येवून तीन जणांनी श्रीरामपूर भाजपा शहर उपाध्यक्ष व त्यांच्या भावास लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा शहर उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी कामगार अण्णा भालेराव व त्यांचे धाकटे बंधू सुरेश भालेराव या दोघांना अक्षय खंडागळे, गणेश खंडागळे व दीपक खंडागळे यांनी लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्राने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही भावांच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ते गंभीर जखमी असून कामगार हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी अण्णा भालेराव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील वॉर्ड नं. 6 मध्ये दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी अण्णा भालेराव हे त्यांची गाडी लावून घरी जात असताना, दीपक खंडागळे व अक्षय खंडागळे हे दोघे एका बंद घराचे कुलूप तोडत होते, तेव्हा अण्णासाहेब भालेराव त्यांना म्हणाले, तुम्ही कशाला (पान 6 वर)लोकांच्या घराचे कुलूप तोडता, त्याने लोकांचे नुकसान होते, असे म्हणाल्याचा राग आल्याने दीपक खंडागळे व अक्षय खंडागळे यांनी अण्णासाहेब भालेराव यांना शिवीगाळ केली.
नंतर रात्री नऊ वाजता अण्णा भालेराव व त्यांचे बंधू सुरेश भालेराव हे दोघे घराशेजारीच असणार्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभे असताना तेथे अक्षय खंडागळे, गणेश खंडागळे, दीपक खंडागळे हे आले, त्यांनी अण्णा भालेराव व त्यांच्या बंधूंना शिवीगाळ करत लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्राने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत दोन्ही भावांच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय अन्याय संहिता बी. एन. एस. चे कलम 109, 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे वरीत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने या आरोपींच्या विरोधात कठोर पाऊले उचलावित, त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा रोड दुकानदार, व्यापारी, कारखानदार आणि हमाल मापाडी कामगार संघटना व भीमनगर भागातील रहिवासी यांच्याकडून करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीसआयुक्त, पोलीस अधिक्षक, पोलीस उपाधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका व शहर पोलीस निरीक्षक आदींना देण्यात येणार आहे.