नाशिक | प्रतिनिधी
महापालिकेतील सत्तास्थापनेचा पुढील टप्पा आता औपचारिकरीत्या सुरू झाला असून, महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयात या दोन्ही पदांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेनुसार,३ फेब्रुवारी रोजी नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत छापील अर्ज उपलब्ध असतील. त्याच दिवशी सकाळी ११ तेदुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
नाशिक मनपाच्या अलीकडील निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली, तर काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट आणि मनसे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्यामुळे सत्तेचे गणित सध्या भाजपच्या बाजूने झुकले आहे.
महापौरपद यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक महिला नगरसेवक या पदासाठी इच्छुक आहेत. पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला असून, लॉबिंग जोरात सुरू आहे. या पदासाठी हिमगौरी आडके आहेर, संध्या कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, दीपाली गिते, रूपाली नन्नावरे, ऐश्वर्या लाड-जेजुरकर यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र भाजप कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.
कोणाला कोणती पदं मिळणार याबाबत सस्पेन्स
भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तरी राज्यात सोबत असलेल्या महायुतीतील घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजीत पवार) यांना मनपाच्या सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र सत्तेतील कोणती पदे कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विविध विषय समित्यांच्या सभापती तसेच विभाग सभापती या महत्वांच्या सत्ता पदांपैकी भाजप मित्र पक्षांना कोणती पदे देणार हे अद्याप स्पष्ट न झाल्याने भाजप सोबत दोन्ही पक्ष सत्तेत जाणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. राज्य आणि केंद्रात सत्तेत असले तरी मनपा निवडणुकीत भाजप स्वतंत्र तर सेना व राष्ट्रवादी सोबत उतरले होते. सेनेला २६ तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? CM सोबतच्या बैठकीत काय झालं? प्रफुल्ल पटेलांनी सगळचं सांगितलं
मात्र आता निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची कवायत सुरु आहे. मनपात भाजपकडे बहुमत आहे त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापन केल्यास सर्व निर्णय थेट घेता येतील, असा एक मतप्रवाह आहे. यामुळे प्रशासनात वेग येईल आणि विकासकामांना गती मिळेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, राज्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता मित्रपक्षांना डावलणे योग्य ठरणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे. महायुती टिकवणे हे केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यस्तरीय राजकारणासाठीही महत्वाचे मानले जात आहे. भाजपने प्रस्ताव दिला असला तरी शिव-सेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. दोन्ही पक्षांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर बसायचे, याचा अंतिम निर्णय राज्य नेतृत्वाकडे असल्याचे संकेत आहेत.
“नाशिक मनपात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आम्ही एकत्र काम करावे असे आमचे मत आहे. राज्यात व केंद्रात आम्ही तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहे. त्यामुळे नाशिक मनपामध्ये सुध्दा महायुती म्हणून एकत्र काम करावे असे आम्हाला वाटते. तसे प्रस्ताव दोन्ही पक्षांना दिला” असल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले.
याबाबत शिवसेना उपनेते अजय बोरस्ते म्हणाले, भाजपकडून शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव तीन दिवसापूर्वी मिळाला आहे. प्रस्तावावर विचारविनिमय होणार आहे. सन्मानजनक प्रस्ताव राहिला तर त्याच्यावर विचार करण्यात येईल. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. अंतिम निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे बोरस्ते म्हणाले.




