Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याDevendra Fadanvis : फडणवीसांनी नागपुरात पूरग्रस्तांना अरेरावी केली? ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा,...

Devendra Fadanvis : फडणवीसांनी नागपुरात पूरग्रस्तांना अरेरावी केली? ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा, काँग्रेसला लगावला टोला

मुंबई | Mumbai

मुसळधार पावसाने शनिवारी नागपूर शहराला झो़डपले असून अवघ्या 4 तासांत 100 पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. या पूरग्रस्त भागाची रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाणी केली. या पाहाणीदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात एका नागरिकाचा हात धरून फडणवीस ओढताना दिसतात. त्यावरून राजकारण रंगले आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने अरेरावीचा आरोप केला आहे, मात्र दुसरा व्हिडीओ ट्वीट करत भाजपाने हा आरोप खोडून काढत काँग्रेसला टोला लगावला आहे.

- Advertisement -

नेमका काय आहे व्हिडीओ?

नुकसानाची पाहणी करत असताना एक नागरिक फडणवीसांच्या जवळ आला. तो फडणवीसांना झालेल्या नुकसानाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी फडणवीसांनी त्याचा हात धरला आणि त्याला गाडीच्या दिशेने नेले. यावर ट्वीट करत काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तर फडणवीसांनी त्याला रागामध्ये ओढत नेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, काँग्रेसनं टीका सुरू केल्यानंतर त्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रसंगाचा मोठा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला असून त्यावरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं आहे.

श्रीरामपूर दरोडा प्रकरणी खळबळजनक खुलासा! दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीनेच आवळला पतीचा गळा

भाजपने काय म्हटलं?

भाजपने यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओसह आणखी एक व्हिडीओ जोडला आहे. यामध्ये फडणवीसांनी त्या नागरिकाच्या घरी जाऊन दुष्काळाची पाहणी केल्याचं दिसत आहे. यावर स्पष्टीकरण देताना भाजपने म्हटलं की, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा! (गर्दीतून त्याला जवळ ओढल्याचा स्पष्ट व्हीडिओ आणि त्याच्या घरी प्रत्यक्ष भेट दिल्याचा व्हीडिओ सोबत जोडला आहे) पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…!’

- Advertisment -

ताज्या बातम्या