मुंबई | Mumbai
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता ५ जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याने महायुतीच्या नेत्यांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. या विजयी मेळाव्यापूर्वीच ठाकरे बंधूंवर महायुतीचे नेते टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
राज ठाकरेंना छळले, त्रासही दिला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच त्यांना खोचक शब्दात सुनावलेही आहे. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती…, असे म्हणत उद्धव ठाकरे भाऊबंदकी या नात्याने राज ठाकरे यांना परत जवळ करायचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटते? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
गेलेले मिळवण्याची क्षमता उध्दव ठाकरेंमध्ये नाही
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. गेलेले परत मिळवण्याची धमक, क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, अशी टीका नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
जशास तशी पोस्ट
उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती!
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





