मुंबई । Mumbai
टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय शो असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या शोचे होस्ट बिग बी अमिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. शोमध्ये एका स्पर्धकाला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे हा वाद निर्माण झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपाच्या आमदाराने केला आहे. औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी बच्चन यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
‘कर्मवीर स्पेशल’ भागात सफाई कर्मचारी आंदोलनाचे सदस्य बेजवाडा विल्सन आणि त्यांची साथ द्यायला टीव्ही स्टार अनूप सोनीही उपस्थित होते. खेळ सुरू झाल्यानंतर, अमिताभ यांनी विल्सन यांना ‘मनुस्मृती’ बद्दल एक प्रश्न विचारला होता. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली असून हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे.
अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली.
३० आॅक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास १ शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही. हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. पण प्सुडोसेक्युलॅरिझम चे ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. लातूर पोलिस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलिस गुन्हा नोंदवू शकतात. लवकरच एफआयआर नोंदवला जाईल अशी अपेक्षा आहे.”
काय होता प्रश्न…?
२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी यापैकी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?
१) विष्णु पुराण २) श्रीमद् भगवद्गीता ३ ) ऋगवेद ४) मनुस्मृति