बीड | Beed
आज दसऱ्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी मोठ्या जल्लोषात मेळाव्या आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलतांना तुम मुझे कबतक रोकोगे…अशी कविता ऐकवत खास शैलीत पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित केले.
पंकजा मुंडे मेळाव्यात बोलताना म्हणाल्या की, आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते. असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही, असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्यानं भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.
धनंजय मुंडेंवर घणाघात
करोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तमुची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर. केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? हे असं आहे त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? आम्ही सरकारकडेच मागणार ना? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या… असं करेन अन् तसं करेन.. आता काय आहे बीड जिल्ह्याची अवस्था असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे.
दरम्यान, सरकार मजबूत आहे का, सरकार पडेल की नाही याच्याशी आमचा संबंध नाही. पण तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात ते सांगा. सत्ताधाऱ्यांनी त्यांचं काम करावं, विरोधकांनी त्यांचं काम करावं, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रात माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातीलच काम सुरू आहेत. लोकांना केंद्र सरकारचे दोन हजार रुपये मिळतात, राज्याकडून काही मिळत नाही. आपलं मंत्रिपद भाड्याने दिल्यासारखं महाविकास आघाडीचं काम सुरू आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.




