नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजपने ‘जनरेशन-जी’ म्हणजेच तरुण मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना विद्यापीठे आणि सरकारी शाळांमध्ये थेट संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क वाढवण्यास सांगितल्यानंतर काही दिवसांतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. तरुणांच्या अपेक्षा, प्रश्न आणि बदलत्या राजकीय विचारविश्वाचा अभ्यास करून त्यांच्याशी अधिक प्रभावीपणे जोडले जाणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.
हे नेते टीममध्ये असणार
भाजपच्या या विशेष टीममध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत गुजरात सरकारमधील मंत्री हर्ष सांघवी आणि छत्तीसगड सरकारमधील मंत्री ओ. पी. चौधरी यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. या टीममध्ये आणखी काही नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सत्तेच्या दबावातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; पुण्यातील राड्यावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
तरुणांशी थेट संवादावर भर
भाजपचा हा Gen Z Outreach Programme केवळ पक्षाच्या पारंपरिक प्रचारापेक्षा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न आहे. तरुणांच्या शिक्षण, रोजगार, करिअर, स्टार्टअप, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल संधी यांसारख्या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधण्याची दिशा या उपक्रमातून अपेक्षित आहे.
भाजपची नवीन टीम ‘जनरेशन-जी’ (Gen-G) मतदारांमध्ये ‘युवा संवाद’ मोहीम सुरू करणार आहे. या उपक्रमांतर्गत, 14 ते 25 वयोगटातील तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘जनरेशन-जी’चे विचार, चिंता, गरजा आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
तरुणांना भाजप नेत्यांशी थेट संवाद साधण्याची आणि आपले प्रश्न मांडण्याची संधीही दिली जाईल.
कार्यक्रमाचे वेळापत्रक, स्वरूप आणि ठिकाणाचा तपशील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
‘वंदे मातरम’वर प्रचार करण्याचा निर्णय नवीन टीमच्या बैठकीत घेण्यात आला.
वंदे मातरम् शी तडजोड केली जाणार नाही
दरम्यान, नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखालील नवीन 65 सदस्यीय राष्ट्रीय टीमची पहिली बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडली. ‘वंदे मातरम’ संदर्भात काँग्रेसच्या निर्णयाविरोधात एक ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचे केवळ दोन परिच्छेद गाण्याच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला. राजकीय सोयीसाठी किंवा लांगुलचालनासाठी ‘वंदे मातरम’च्या आदराशी तडजोड केली जाणार नाही, असे पक्षाने म्हटले आहे. भाजप देशभरात आपला वारसा जपण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे.




