Tuesday, May 7, 2024
Homeराजकीय'पुन्हा लॉकडाऊन करण्याला भाजपचा कडाडून विरोध'

‘पुन्हा लॉकडाऊन करण्याला भाजपचा कडाडून विरोध’

पुणे(प्रतिनिधी)-

वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही.

- Advertisement -

त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

लॉकडाऊन न लावता कोरोना टेस्टिंग वाढवण्यावर सरकारने भर द्यावा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदार संघात हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती परिसरात पोलीस चौकी उभारावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक रुपयाचे ही पॅकेज महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले नाही.झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची अवस्था सध्या खूप बिकट आहे. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल. प्रत्येक झोपडपट्टीतील नागरिक दिवसभर काहींना काही काम करतात आणि त्यानंतर त्यांना जेवण मिळते. त्यांना तुम्ही आजवर काही दिले नाही. त्यामुळे आता परत कोरोनाचे प्रमाण वाढले म्हणून तुम्ही परत लॉकडाऊन लावणार का ? लॉकडाऊन लावायचे असेल तर हातावर पोट असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दर महिन्याला पाच हजार रुपयांचे पॅकेज द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे

सरकारने लॉकडाऊन लागू न करता काळजी घेऊन नित्याचे व्यवहार सुरूच ठेवले पाहिजे. नाईट कर्फ्यु सुरू ठेवा, त्याने सर्वसामान्य नागरिकांना काही फरक पडणार नाही. परंतु दिवसभराचे दिनक्रम सुरूच राहिले पाहिजेत. कोरोनावर उपाययोजना म्हणून टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत, कोरोना झालेल्यांची ओळख लवकर पटवा त्यांच्यावर लवकर उपचार करा, उपचार केंद्र वाढवा, परंतु हे न करता तुम्ही लॉकडाऊन लावत असणार तर हे शक्य नाही. आम्ही लॉकडाउनला कडाडून विरोध करू. व्यापारी, कामगारसुद्धा लॉकडाऊनला विरोध करतील, असेही पाटील म्हणाले.

शरद पवार – अमित शहा यांच्या भेटीबाबत मीही अनभिज्ञ

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच भेट झाली आहे, असे दिसून येते. मात्र, या बैठकीबाबत आणि त्यांच्यातील चर्चेबाबत मी देखील अनभिज्ञ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. अमित शाह यांना भेटण्याची वेळ ही रात्री अकरानंतरच असते. परंतु, शरद पवारांची भेट इतकी निवांत का झाली ? अहमदाबादमध्येच का झाली? एका उद्योगपतीच्या घरी का झाली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. तुमच्या इतकाच मीही याबाबत अनभिज्ञ आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, अशी चर्चा आहे. शरद पवार एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला गेले होते. अमित शाह हेदेखील प्रवासातून घरी गेले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली असेल याबद्दल दुजोरा मिळत आहे. परंतु, ही भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच भेट झाली आहे, असे दिसून येते.

प्रत्येक भेट राजकारणासाठी नसते. अशा प्रकारच्या भेटी नियमितपणे होत असतात. राजकारणा व्यतिरिक्तही आपण भेटले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्रीचे संबंध आपल्या जागी, असे भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. परंतु, अलीकडच्या काळात महाराष्ट्रत अशा भेटीगाठी कमी झाल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधारी हे वैऱ्यांसारखे वागत आहेत. त्यामुळे पवार आणि शाह यांच्या भेटीला देखील संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भेट झाली म्हणजे ती राजकीय चर्चेसाठीच झाली असे म्हणता येणार नाही, असे पाटील म्हणाले.

अमित भाईंच्या ‘अशा भेटी जाहीरपणे सांगायच्या नसतात’ या वाक्यामुळे भेट झाली असावी असे मला वाटते. अन्यथा अमित भाई इतके शूर आहेत की त्यांनी स्पष्टपणे भेट झाली नाही असे सांगितले असते. त्यांच्या या भेटीत कुठलेही राजकीय संकेत नाहीत. अमित शाह यांना भेटण्याची वेळ ही रात्री अकरानंतरच असते. परंतु, शरद पवारांची भेट इतकी निवांत का झाली ? अहमदाबादमध्येच का झाली? एका उद्योगपतीच्या घरी का झाली? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. तुमच्या इतकाच मीही याबाबत अनभिज्ञ आहे, असे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आलीच तर तुमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची तयारी आहेत का ?असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मी एक सच्चा स्वयंसेवक, सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते मान्य करायचे असते आणि तेच पक्षाच्या हिताचे असते. अमित शाह, जेपी नड्डा, नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या