Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप युवा मोर्चाचे 'एक सही भविष्यासाठी' अभियान

भाजप युवा मोर्चाचे ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गाला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती दिली मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे हे अभियान सोमवारपासून सुरू होईल, असे शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

अभियानाची माहिती देताना शेलार म्हणाले, आम्ही मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. ६५ वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे मिळाले नाही असे नवीन आयआयएम मुंबईला देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई (नीटी)ला आयआयएम ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज नाही. मुंबईत ३५० जागा एमबीएच्या घेऊन आयआयएम सुरू होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आता आमचे राजकीय विरोधक तोंड बंद का करून आहेत? असा आमचा सवाल आहे. खोट्या आणि विपर्यास असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून मुंबईतून, राज्यातून हे गेले बाहेर ते गेले बाहेर असे खोटे सांगितले जाते. केवळ राजकीय स्वार्थासाठी काम करणारे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असो हे आज मुंबईला आयआयएम आले याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ते आज मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यान्वित होईल. रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम त्यात असतील. म्हणून स्वाक्षरी अभियानातून आयआयएमची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. अगोदरच्या सरकारच्या काळातील एम्सपेक्षा २१४ टक्के वाढ मोदी सरकारमध्ये झाली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये ९३ टक्के वाढ झाली आहे. हे मोदी सरकारचे यश आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, असे शेलार यांनी सांगितले.

आज देशात सात नवीन आयआयटी, आठ नवीन आयआयएम होत आहे. यामुळे जगाच्या पातळीवर भारतीय विद्यार्थी चमकणार आहेत. शहरी बेरोजगारीचा दर ६.८ टक्क्यांनी कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. मुंबईला आज भरभरून मिळत असल्याचा आनंद आम्हाला आहे. या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आशीष शेलार यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या