नाशिक | प्रतिनिधी
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल रामवाडी ते विसे मळा मार्गावरील गोळीबार प्रकरणात बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मीक राजवाडे याला अटक करण्यात आली आहे. राजवाडे यांची गुरवारी १० तास चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले होते. या गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
मामा राजवाडे, सुनील बागुल यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप गुन्हेगारांना पक्षात कसे प्रवेश देता, यावरुन खूप टीका झाली होती. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. जुन्या वादातून दोघांवर गोळीबार करत मारहाण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मामा राजवाडे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटात महानगरप्रमुख होते. मात्र, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. शुक्रवारची सकाळ उजाडली तरी पोलिसांनी मामा राजवाडे यांना घरी सोडले नव्हते. मामा राजवाडे यांना क्राईम ब्रँचने दाखवलेल्या या पोलिसी खाक्याची सध्या नाशिकच्या राजकारणात प्रचंड चर्चा रंगली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




