अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांची भारतीय जनता पार्टीच्या अहमदनगर उत्तरचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रदेश भाजपच्या आदेशाने उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर यांनी ही नियुक्ती केली.
अकोले तालुक्यातील मुळचे वीरगावचे असणारे जालिंदर वाकचौरे देवठाण गटाचे जि.प.सदस्य असून भाजपाचे गटनेते आहेत. भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा सरचिटणीस या प्रवासात त्यांना पक्षाने अनेक पदांवर संधी दिली. अकोले तालुका सरचिटणीस, उपाध्यक्ष, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस,उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष या सर्व पदांवर काम करताना त्यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या प्रस्थापित अकोल्यात भाजपचे कमळ सर्वदूर पोहच केले.
विद्यमान जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून कामकाज करताना शिक्षण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांचा प्रभाव आहे.संपुर्ण जिल्ह्यात प्राथमिक शाळा भेटींच्या नियमीत पाहणीतून विद्यार्थी गुणवत्तेबाबद त्यांनी जागरुकता निर्माण केली.सर्वत्र खासगी इंग्लिश मिडीअमचा बहार दिसत असताना त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांकरवी ग्रामीण भागातील पालकांमध्ये प्राथमिक शाळांबाबद सकारात्मकता निर्माण केली. सध्या जिल्हा परिषद शाळांचा वाढलेला पट ही सर्व जि.प.सदस्यांची मेहनत असल्याचे ते मानतात.
अहमदनगर जिल्हा परिषदेत गटनेते म्हणून वाकचौरेंचा मोठा प्रभाव आहे. जि.प.च्या अनेक सर्वसाधारण सभांमध्ये त्यांनी विविध विषयांवर सत्ताधा-यांना कायम धारेवर धरले.विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले.करोना कालावधीत आरोग्य खात्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांना येणा-या अडचणीबाबदही त्यांचा पाठपुरावा असतो.
देवठाण जि.प.गटात आजपर्यंत अनेक कामे त्यांनी जि.प.च्या माध्यमातून मार्गी लावली. त्यांचे निवडीने देवठाण गटातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचे निवडीबद्दल माजी मंत्री राम शिंदे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सितारामपाटील गायकर,अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे आदींनी अभिनंदन केले आहे.
भाजपाने आजपर्यंत विविध पदांवर काम करण्याची संधी दिली.जि.प.मध्येही पक्षाने संधी दिली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे.पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षहितासाठीच पार पाडून उत्तर अहमदनगर जिल्ह्यात तळापर्यंत पक्षबांधणीचे काम जोमात करुन पक्षाची धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येईल.
जालिंदर वाकचौरे (सरचिटणीस,उत्तर नगर. भाजपा गटनेते)