Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedसोन्याच्या नावाखाली दिली 'काळी माती'

सोन्याच्या नावाखाली दिली ‘काळी माती’

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

स्वस्तात सोने व सोन्याची काळी माती देण्याचे आमिष दाखत तीन आरोपींनी मिळून एका सराफा व्यापाऱ्यास ३० लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना शुक्रवारी घडली. सोन्याची माती म्हणून आरोपींनी सराफा व्यापाऱ्यास केवळ काळसर रंगाची चार किलो माती दिली होती. फिर्यादी गौतम सेठीया (वय ५८, रा. नाजगल्ली) असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. 

- Advertisement -

जास्तीचा नफा पडला महागात ; जवानाला १० लाखांचा गंडा

या सराफ्याचे कासारी बाजारात ज्वेलर्सचे दुकान आहे. अजय चौधरी (रा. हरियाणा) हा फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना दुध व तुप विकत देत होतो. त्यामुळे तो फिर्यादी यांच्या ओळखीचा होता. २३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अजय व त्याच्या सोबत अन्य एक असे दोन जण फिर्यादीच्या घरी आले. अजय याने त्यान्याकडे सोन्याची माती असून स्वस्तात देतो, असे सांगत सोन्याचे मातीचे सॅम्पल दाखविले. फिर्यादीने ती माती सोन्याच्या भट्टीत गाळून पाहिली असता त्यामध्ये सोने निघाले. त्यामुळे फिर्यादी गौतम यांचा अजय चौधरीवर विश्‍वास बसला. तेव्हा अजय याने आणखीन चार किलो माती आहे, ती घेऊन येतो, असे सांगितले. मातीच्या बदल्यात ६७ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

शुक्रवारी दुपारी अजय चौधरी, त्याच्या सोबत त्याचा चाचा म्हणत असलेला ६० ते ६५ वयाचा व्यक्ती फिर्यादीच्या घरी आले. त्या दोघांनी सोन्याची माती घेऊन आलो आहोत. आमचा सहकारी पुनमसिंग (५५) याकडे सोन्याची माती असून तो पानदरीबा येथील हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. पुनमसिंगला सोबत घेऊन ते पुन्हा फिर्यादीच्या घरी आले. तेथे आरोपींनी सोन्याची माती म्हणून चार किलो काळसर रंगाची माती दिली. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना २५ लाख रुपये दिले व १२ तोळे सोन्याचे दागिने असे पाच लाख किंमतीची दागिने दिले. व राहिलेले ३७ लाख रुपये नंतर देण्याचे ठरले होते.पैसे व दागिने मिळाल्यावर आरोपी रिक्षाने निघून गेले. त्यानंतर सराफा व्यापारी गौतम यांनी सोन्याची माती सोने गाळण्याच्या भट्टीत जाऊन गाळली. मात्र त्यात सोने दिसून आले नाही. सोन्याची माती ही दिलेली काळसर माती पूर्णपणे जळून गेली. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या