Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्यामहापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती?

महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती?

मुंबई । Mumbai

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली असून देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेची (BMC) रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, शिवेसना (ठाकरे गट) या निवडणुकीला अस्तित्वाची लढाई मानत आहे. या महत्त्वाच्या लढाईत, पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या प्रचाराची आणि विविध मेळाव्यांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

एकीकडे, मुंबई महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे ‘महायुती’ म्हणून एकत्रितपणे ताकद पणाला लावणार आहेत. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेवरील आपला दबदबा कायम राखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे चित्र आहे. पुढील आठवडाभरात उमेदवारांची यादी निश्चित करायची असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या रणनीतीत युवा मतदारांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तरुणाईचे प्रश्न आणि त्यांचे विविध ज्वलंत मुद्दे प्रचारात प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. निवडणुकीत युवाशक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करणार आहेत.

YouTube video player

शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर आणि विविध प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे तसेच प्रशासक नियुक्त झाल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे नेमके प्रश्न आणि त्यांच्या अडचणींची जाण आदित्य ठाकरे यांना आहे. याच ज्ञानाचा उपयोग ते आपल्या प्रचारसभांमधून करणार आहेत. प्रचारात कोणते मुद्दे प्रकर्षाने मांडायचे, याचे नियोजन ते आपल्या मेळाव्यांच्या माध्यमातून करत आहेत.

राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे गट) निवडणुकीला सामोरे जात आहे. महत्त्वाच्या सर्व जबाबदाऱ्या घेण्यास आदित्य ठाकरे यांनी तयारी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकांमध्ये लक्ष देत असताना, आदित्य ठाकरे हे मुंबईसह तीन ते चार महत्त्वाच्या महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे.

मुंबईसोबतच नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये देखील आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. या शहरांमध्येही ते मेळावे घेऊन पक्षाचा प्रचार करतील. शिवसेना पक्षातील फुटीनंतर होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘अस्तित्वाची लढाई’ आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वात सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून पक्षाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे निवडणुकीतील लढत अधिकच चुरशीची होणार आहे.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...