मुंबई | Mumbai
मागील काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड होणार, हे पद भाजपाकडे जाणार की शिवसेनेला मिळणार या चर्चा सुरू होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यानुसार, पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई मनपा महापौराची निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत. यावेळी मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम, शिवसेनेचे (शिंदे) राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे गटनेते गणेश खणकर उपस्थित होते.
घाटकोपरमधील गुजराती बहुल भागातील मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिले जाते. वॉर्ड क्रमांक १३१ मधून रितू तावडे विजयी झाल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सलग दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या आहेत.
तत्पूर्वी शिवसेनेने (शिंदे) उपमहापौर पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे उपमहापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा केली. पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दहिसर पूर्वचे नगरसेवक संजय शंकर घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली असल्याचे राहुल शेवाळे यांनी जाहीर केले. शिवसेनेकडून (शिंदे) मुंबई महापालिकेचे उपमहापौरपद हे सव्वा वर्षाचे असेल असे देखील शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईची सेवक म्हणून काम करणार-रितू तावडे
मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असे मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना अधिक काम करण्याची संधी दिली जाणार
भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती म्हणून निवडणुकीला सामोर गेलो होतो. निवडणुकीतील विजयानंतर महायुतीच्या 118 नगरसेवकांमधून महापौर होईल असे आम्ही जाहीर केले होते, कोणत्या पक्षाचा महापौर होईल हे आम्ही जाहीर केले नव्हते. शिवसेनेकडून सव्वा वर्षासाठी उपमहापौर पद देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या पक्षाच्यावतीने अधिक कार्यकर्त्यांना अधिक काम करण्याची संधी दिली जाणार असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असेल. भाजपने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे अमित साटम यांनी सांगितले.
ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार का?
भाजपचा उमेदवार मराठी असणार की अमराठी असणार?? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपनेे ठाकरेंना कोणतीही संधी न देता रितू तावडे या मराठी उमेदवाराला संधी दिली आहे. रितू तावडे या गुजरातीबहुल घाटकोपरमधील आहेत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाकडूनही उमेदवार दिले जाणार का? याची उत्सुकता आहे. या संदर्भात आज ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.





