मुंबई | Mumbai
बॉलिवुड अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून डाव्या गुडघ्याला गोळी लागली होती. त्यांना दोन दिवस क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोविंदाची प्रकृती आता ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर गोविंदाने सगळ्यांचे आभार मानले आहेत.
गोविंदा रुग्णालयाबाहेर येताच माध्यमांनी त्यांच्या भोवती गर्दी केली होती. यावेळी गोविंदाने मोजक्याच शब्दात सर्वांशी संवाद साधला. गोळी लागल्याच्या घटनेनंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे अभिनेत्याने हात जोडून आभार मानले. त्यांच्या विविध चाहत्यांनी त्यांना बरे वाटावे म्हणून पूजापाठ केला होता, तर कोणी दुआ पठण केले होते. गोविंदा यांनी त्या सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘जय माता दी’ असेही म्हटले. यावेळी त्याच्या डाव्या पायाला प्लॅस्टर लावल्याचे ही दिसले.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी पुढील काही दिवस त्याला काळजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलचे डॉ रमेश अग्रवाल यांनी सांगितले, “गोविंदा बरे आहेत. त्यांना ३-४ आठवडे विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचे व्यायाम आणि फिजिओथेरपी सुरू आहे. ते ठीक आहेत. आम्ही त्याला डिस्चार्ज देत आहोत. ते घरी आराम करतील. त्यांचे डाएटही व्यवस्थित सुरू आहे.”
नेमके काय घडले होते?
मंगळवारी पहाटे प्रवासाची तयारी करत असताना घरी ते आपले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत होते. तेव्हा रिव्हॉल्व्हर खाली पडलं आणि ते अनलॉक असल्यानं त्यातून गोळी सुटली. ती गोविंदा यांच्या गुडघ्याखाली पायात शिरली. गोळी सुटल्याच्या आवाज ऐकू येताच नोकर तसेच शेजारी धावून आले आणि त्यांनी तातडीनं गोविंदा यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी काढण्यात आली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा