Friday, August 21, 2026
HomeनगरAhilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना मिळणार...

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना मिळणार लाभ !

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत वयोवृद्ध व बोटांच्या ठशांचे आधार प्रमाणीकरण करण्यात अडथळे येत असल्याने सहकार विभागाने अशा शेतकर्‍यांबाबत विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. नगर जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकर्‍यांना सहकार विभागाच्या नवीन कायपध्दतीचा कर्जमाफीत लाभ मिळणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी सरकारने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने 16.96 लाख इतक्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 13 लाख 48 हजार लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. अद्याप राज्यात 3 लाख 48 हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू आहे. आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय कर्जमुक्ती योजनेचा लाभ देता येत नसल्याने त्यामध्ये मृत शेतकरी व वयोवृद्धांच्या बोटांचे ठसे घेण्यामध्ये अडथळे जाणवत आहेत. या संदर्भातील कार्यपद्धत सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ठरवून दिली आहे.

यानूसार जिल्ह्यात बोटाचे ठसे न उमटणारे 283 आणि मयत असणार्‍या 3 हजार 177 अशा 3 हजार 460 शेतकर्‍यांना सहकार खात्याच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांना वारस नोंदी करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करायची आहे. या प्रक्रियेत पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या मृत शेतकर्‍यांची माहिती काढणे व त्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यासाठी महाआयटीमार्फत मानक कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. कर्जदार शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रचलित धोरणाप्रमाणे वारस नोंद करून घ्यायची आहे.

वारस नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सुविधेमार्फत वारसाची माहिती अपलोड करायची आहे. मृत शेतकर्‍यांशी संबंधित पूर्वीचे कर्जखाते क्रमांकसह कर्ज खात्याची माहिती अपलोड करायची आहे. त्यापूर्वी जिल्हा बँकेच्या संबंधित शासकीय लेखापरीक्षकांमार्फत कर्ज खात्याची तपासणी करायची आहे. महाआयटीमार्फत संस्करण केल्यानंतर लाभास पात्र असलेल्या कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी ग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी) आवश्यक राहील. एकापेक्षा अधिक वारसदार असल्यास वारसांच्या हिश्याची प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात वर्ग केली जाईल. वारसापत्र असल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. एकापेक्षा अधिक वारस असल्यास त्यांना पूर्णांकामध्ये, हिश्यानुसार वाटप केले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

आधार प्रमाणीकरण प्रक्रियेत वयोवृद्धांच्या बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणार्‍या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात अडथळा येत असल्याने शेतकर्‍यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राला यादीतील विशिष्ट क्रमांकासह भेट द्यावी. सोबत आधारकार्ड, बँक पासबुक घेऊन जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर आपल्या कर्जाची माहिती दिसल्यानंतर मान्य-अमान्य पर्यायाची नोंद करून ऑनलाईन बोटाच्या ठशांची नोंद घेण्यात येईल. एका बोटाच्या ठशाची नोंद होत नसल्यास वेगवेगळ्या बोटाने किमान तीनवेळा प्रामाणिकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

तरीही प्रमाणीकरण होत नसल्यास प्रामाणिकरण शक्य नाही या पर्यायाचा वापर आपले सरकार केंद्र चालकांनी करायचा आहे. या पर्यायाचा वापर केल्यानंतर आपले सरकार केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरीय समितीकडे पोर्टलद्वारे तक्रार पाठवली जाईल. तालुकास्तरीय समितीद्वारे तक्रार मान्य करण्यात येऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल व शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमुक्तीच्या लाभाची ऑनलाईन पद्धतीच्या निकषानुसार रक्कम जमा करण्यात येईल, जिल्हा सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी...