दिघवद | वार्ताहर
‘अमर रहै अमर रहै किशोर ठोके अमर रहै’ अशा घोषणांनी तालुक्यातील पाटे येथील वीर जवान किशोर अंबादास ठोके यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करत अखेरचा निरोप देण्यात आला.
पाटे येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले किशोर अंबादास ठोके (वय 30) हे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असताना दि.12 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरगती प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव दि.14 रोजी दुपारी 3.30 वाजता मुळगावी पाटे येथे आणण्यात आले.
पार्थिव घराजवळ ठेवताच आई, पत्नी वैशाली, भाऊ व कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण हळवे झाले. फुलांनी सजविलेल्या रथातून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मोकळ्या जागेत अत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती व परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.
या वेळी तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, पी.आय. कैलास वाघ, जिल्हा सैनिक बोर्डाचे ज्ञानेश्वर रोढे, 56 आर.आर.चे कर्नल अरविंद, तसेच विविध माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायत व ग्रामस्थ उपस्थित होते. पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. भारतीय सैन्यदल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली.
यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.




