नांदुरी | वार्ताहर Nanduri
सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून कार मात्र आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक स्विफ्ट कार क्रमांक MH 12 KN 8625 ने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. घाट चढत असताना कारचे इंजिन गरम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने वाहन थांबवून पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक कारने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
कारला आग लागल्याने घाट परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून कारमधील मायलेक सुरक्षित असल्याची खात्री केली. तसेच घटनास्थळी बॅरिकेड्स लावून मदतकार्य सुरू केले.
आगीच्या पार्श्वभूमीवर नांदुरी पोलिस चौकीकडून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या भाविक व वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सप्तशृंगी गड घाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाने दि. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत शनिवार व रविवार वगळता घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच घाटात कारला आग लागल्याने वाहतूक व्यवस्थेवर आणखी परिणाम झाला आहे.
घटनेची अधिक माहिती व आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.




