Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याUnion Budget 2024 : अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या मोठ्या घोषणा;...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या कोणत्या क्षेत्राला काय मिळाले?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज गुरुवारी संसदेत मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिले होते. त्यामुळे नेमके या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला काय मिळाले ते जाणून घेऊयात.

- Advertisement -

यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने कृषी क्षेत्रावर भर टाकल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे. पीएम किसान योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामण यांनी दिली. तर ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले असून ३९० कृषी विद्यापीठं सरकारने सुरु केल्याचे सीतारमण म्हणाल्या. याशिवाय तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असून सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामण यांनी केली. तसेच मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेसाठी देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून तीन नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जाणार असल्याचे सीतारामण यांनी म्हटले. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल. यासाठी ४० हजार सामान्य रेल्वे बोगी वंदे भारत मानकात रूपांतरित केल्या जातील. तर २०२३ च्या एकूण ४५ लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रेल्वेचा वाटा २.४ लाख कोटी रुपये होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सातत्याने वाढली आहे.

तर महिलांसाठी देखील अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली असून लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सीतारमण म्हणाल्या की, आतापर्यंत देशातील १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी योजने’चा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला २ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते आता 3 कोटी करण्यात आले आहे. या योजनेत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना एलईडी बल्ब बनवणे, प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती आदी तांत्रिक कामे शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाणार आहे.

तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. तर मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. तसेच आशा सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच तेलबियांवरील संशोधनाला चालना मिळणार असून दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये तीन हजार नव्या आयटीआयची स्थापन करण्यात येणार आहे, स्किल इंडिया अंतर्गत १.८ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ५४ लाख उमेदवारांना को री- स्किल आणि अप स्किल करण्यात आले आहे. देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच उच्च शिक्षण क्षेत्रासाठी सात आयआयआयटी, सात आययआयएम, १६ एम्स आणि ३९० विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे.शिक्षण क्षेत्रासाठी यावर्षी १,१२,८९८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच अर्थसंकल्पात कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात आला असून कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या कररचनेत सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ, रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या २.४ टक्क्यांनी वाढली. यासोबतच मोदी सरकारकडून संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण बजेट ११.१ टक्कांनी वाढवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संरक्षण बजेट ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये झाला आहे. जो जीडीपीच्या ३.४ टक्के असेल. सरकारने संरक्षण बजेटसाठी ६.२ लाख कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत तो ०.२७ लाख कोटी जास्त आहे. सरकारने मागच्या वर्षी संऱक्षण क्षेत्रासाठी ५.९३ लाख कोटी रुपये दिले होते. २०२४-२५ च्या एकूण बजेटपैकी ८ टक्के संरक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात आला आहे.

Budget 2024 Live Updates : निर्मला सीतारामन म्हणाल्या की, वित्तीय तूट ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च ४४.९० कोटी रुपये असून अंदाजे महसूल ३० लाख कोटी रुपये आहे. १० वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. ७ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. २०२५-२०२६ पर्यंत तूट आणखी कमी होईल. Budget 2024 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. तसेच ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. तर गेल्या १० वर्षात टॅक्स कलेक्शन ३ पट वाढले असून १० वर्षापूर्वीचा १० हजारपर्यंतचा टॅक्स माफ करण्यात आला आहे.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा 

तरुणांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा

‘पीएम मुद्रा’ योजनेने तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांसाठी २२.५ लाख कोटी रुपयांपर्यंतची ४३ कोटी कर्जे मंजूर केली आहेत. तर ‘फंड ऑफ फंड्स’, स्टार्टअप इंडिया व स्टार्टअप क्रेडिट हमी योजना तरुणांना मदत करत आहेत.

त्यासोबतच स्किल इंडिया मिशनअंतर्गत १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, ५४ लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला. ३ हजार नवीन आयटीआयची स्थापना करण्यात आली. ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम, १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची स्थापना करण्यात आली 

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या घोषणा

तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील.

पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल.

पंतप्रधान गतिशक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल.

मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे.

४० हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील.

विमानतळांची संख्या वाढली आहे.

एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत.

शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा

शेतीसाठी आधुनिक साठवण

पुरवठा साखळीवर भर

सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन

मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाईल

सागरी अन्न निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य

सरकार ५ एकात्मिक एक्वा पार्क उघडणार

पीएम किसान योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत

पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे.

अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ

अंगणवाडीचा दर्जा सुधारणार, ‘आशा’ कर्मचाऱ्यांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. त्या म्हणाल्या की, महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होत असून लखपती दीदी योजनेंतर्गत देशात १ कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचे उद्दिष्ट २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आले असून ३ कोटी लखपती दिदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी केलेल्या घोषणा

देशात ७ नवे, आयआयटी , ७ नवे आयआयएम

नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार

प्रधानमंत्री आवास योजना 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील ५ वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरे बांधणार

रूफटॉप सोलर प्लान अर्थात सौरऊर्जा योजनेअतंर्गत १ कोटी घरांना ३०० यूनिटप्रती महीना मोफत वीज 

Budget 2024 Live Updates : निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करून २.७ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतके उच्च पातळीचे आहे की, त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली आहे. देशातील सर्व राज्य आणि घटकांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने व्यवस्था केली आहे. आर्थिक क्षेत्र अधिक मजबूत आणि अधिक सुलभपणे कार्य करण्यास सक्षम केले जात आहे. देशातील महागाईबाबतच्या कठीण आव्हानांवर मात करण्यात येत असून महागाईचे आकडे खाली आले आहेत.Budget 2024 Live Updates : निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारने तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या असून ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. Budget 2024 Live Updates : निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. ७८ लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. Budget 2024 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ११.८ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे. देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ घेत असून ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम फसल योजनेचा लाभ दिला जात आहे. आम्ही ३०० विद्यापीठं स्थापन केली आहेत आणि एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले आहे. देशाला नवी दिशा आणि नवी उमेद मोदी सरकारने दिली आहे. Budget 2024 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, २५ कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले आहे. सरकार सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून ७८ लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे. ३४ लाख कोटी रुपये थेट जनधनद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहे.Budget 2024 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचं काम केलं आहे. अन्नाच्या समस्या दूर केल्या आहेत. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढलं आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.Budget 2024 Live Updates : तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली, तेव्हा अनेक आव्हानं होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावं आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना जनतेच्या हितासाठी केल्या. सरकारचं लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे. 2047 पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू, असे त्यांनी सांगितले. Budget 2024 Live Updates : यावेळी बोलतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानं आमच्यासमोर होती. जनहितार्थ कामं सुरू केली आहेत. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेनं आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिलं. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्रानं आम्ही पुढे जात आहोत.Budget 2024 Live Updates : लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाली असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरु आहे. Budget 2024 Live Updates : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत पोहोचले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात तीन महिन्यांचा संपूर्ण हिशेब आहे, जो सरकारला जनतेवर खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होतील आणि जुलै २०२४ पर्यंत केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. Budget 2024 Live Updates : अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्रिमंडळात औपचारिक चर्चा झाली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने  अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.Budget 2024 Live Updates : अर्थसंकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतरिम अर्थसंकल्प मंजूर केला जाईल. या बैठकीला पंतप्रधान मोदीही उपस्थित आहेत. Budget 2024 Live Updates : अंतरिम बजेट २०२४ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठक होईल. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर ११ वाजता संसदेत बजेट सादर केले जाईल.Budget 2024 Live Updates : आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या तीन महिन्यांत होणार आहे. त्याआधी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत सादर करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातील जनतेचे या  अर्थसंकल्पात काय नवीन घोषणा होणार? याकडे लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या