Thursday, June 25, 2026
Homeक्राईमRahuri : बैलगाड्यांद्वारे बेसुमार अवैध वाळू उपसा; शेतकरी संतप्त

Rahuri : बैलगाड्यांद्वारे बेसुमार अवैध वाळू उपसा; शेतकरी संतप्त

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

आधीच अपुर्‍या पावसामुळे राहुरी तालुक्यात पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना, तनपुरेवाडी परिसरातील मुळा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे भविष्यातील जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात बैलगाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी सुरू असून, महसूल व पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकर्‍यांनी केला आहे.

- Advertisement -

मुळा नदीकाठच्या अनेक शेतांमधून नदीपात्रात जाण्यासाठी अनधिकृत रस्ते तयार करण्यात आले आहेत. या मार्गांचा वापर करून बैलगाड्यांद्वारे नदीतील वाळू उपसली जात असून, त्यानंतर रात्रीच्या वेळी ही वाळू टेम्पो व डंपरच्या साहाय्याने मोठ्या शहरांकडे वाहतूक केली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत असताना संबंधित विभाग मात्र हातावर हात धरून बसल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिकांच्या मते, मुळा नदीत यंदा अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अशा परिस्थितीत नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात काढल्याने भूजल पुनर्भरण प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत आहे. नदीतील वाळू ही नैसर्गिक जलसाठ्याची महत्त्वाची घटक मानली जाते.

मात्र, अवैध उपशामुळे नदीची जलधारण क्षमता कमी होत असून भविष्यात विहिरी, बोअरवेल कोरडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील अनेक विहिरींची पाणीपातळी आधीच घटली असून, आगामी काळात शेतीसाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर संकट उभे राहू शकते. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध करणार्‍या किंवा प्रश्न उपस्थित करणार्‍या लहान शेतकर्‍यांना दमदाटी केली जात असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी उघडपणे बोलण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी शेतजमिनींचा वापर वाळू उपशासाठी रस्ते तयार करण्यासाठी करण्यात आल्याने शेतीचेही नुकसान होत आहे. या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांचा वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सहज आणि झटपट पैशाच्या मोहापोटी अनेक युवक या व्यवसायाकडे वळत असून, त्यातून व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पर्यावरणीय किंवा महसुली नसून सामाजिकदृष्ट्याही गंभीर बनला आहे.

अवैध वाळू उपसा आणि वाहतूक उघडपणे सुरू असतानाही पोलीस, महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. मुळा नदीकाठच्या शेतकर्‍यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक त्वरित बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, नदीपात्राचे संरक्षण करावे आणि भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. मुळा नदी वाचवा, शेती वाचवा आणि भविष्यातील पाणी संकट रोखा, असा आक्रोश आता तनपुरेवाडी परिसरातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने यापुढेही डोळेझाक केली तर पर्यावरण, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

0
पुणे |प्रतिनिधी| Pune नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, बुधवारी (24 जून) मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची अधिकृत घोषणा हवामान शास्त्र विभागाने...