Wednesday, February 4, 2026
HomeनगरShrirampur : बंटी जहागिरदार यांची हत्या राजकीय वैमनस्यातून

Shrirampur : बंटी जहागिरदार यांची हत्या राजकीय वैमनस्यातून

बेग बंधूंनी खून केल्याचा आरोप || नगरसेवक रईस जहागीरदार यांची फिर्याद || बंटी जहागिरदार हत्या प्रकरणी दोघांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात काल सेंट लूक हॉस्पीटलसमोर अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या शहरातील गुन्हेगारी टोळीतील लोकांच्या सांगण्यावरुन राजकीय वैमनस्यातून झाली असल्याचा आरोप नगरसेवक रईस जहागिरदार यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. मयत बंटी जहागीरदार यांचे बंधू रईस अब्दुलगणी शेख (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हंटले आहे की, बुधवारी कब्रस्थान येथे अंत्यविधी झाल्यानंतर, मी कामानिमित्त बेलापूर रोड येथे गेलो, त्यावेळी अमिन गुलाब शेख यांचा फोन आला की, तुम जल्दी संतलुक हॉस्पीटल के सामने आवो, मुझपर और बंटीभाई पे बंदुक से फायरींग हुई है, तेव्हा मी तात्काळ संतलुक हॉस्पीटल येथे आलो, तेथे संतलुक हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालु होते.

- Advertisement -

याबाबत अमीनभाई यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, मी व बंटीभाई अंत्यविधी झाल्यावर स्कुटीवर परत घरी जात असताना, दोन अज्ञातांनी बंटी भाईवर बंदूकीतून फायर केला, फायर करताना ‘एकच भाई चन्या भाई’, असे म्हणून गाडीवर ते निघुन गेले. त्यानंतर बंटीभाई यांची तब्येत जास्त खराब असल्याने त्यांना आम्ही साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचार कामी दाखल केले. तेथुन साखर कामगार हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यास सांगितले. तेव्हा अहिल्यानगर येथील साईदिप हॉस्पीटल मध्ये त्यांना उपचारासाठी घेवुन गेलो, तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.

YouTube video player

बंटी जहागिरदार हे 15 ते 20 वर्षापासून सक्रिय राजकारणात होते. त्याची आई नगरपालिकेमध्ये सन 2011 ते 2019 पर्यंत नगरसेविका होती. ती मयत झाल्यानंतर माझी पत्नी सन 2019 ते 2021 या कालावधीत नगरसेविका होती. तसेच मी नुकत्याच झालेल्या डिसेंबर 2025 नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडुन आलो आहे. बंटीचे सामाजिक व राजकीय कारकिर्दीमुळे त्याचे शहरात व तालुक्यात राजकीय वर्चस्व होते, त्याने सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार हेमंत ओगले यांचे काम केल्यामुळे त्यांचा कमी फरकाने विजय झाला होता.

तसेच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासाठी काम करुन त्यांना माझ्या भागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन विजयी केले. शहरात मागील 10 ते 15 वर्षात संघटीत गुन्हेगारी करणारी टोळी ही चन्या बेग, सोन्या बेग व टीप्या बेग हे तिघे भाऊ चालवित असून त्यांच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. बंटी जहागिरदार यांच्या राजकीय वर्चस्वामुळे त्यांना गुन्हेगारी व राजकीय क्षेत्रात अडचण निर्माण होत होती, त्याचा राग म्हणून व सध्या झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यासाठी केलेल्या कामाचा राग या कारणाने त्यांनी माझ्या भावाचा त्यांच्या मुलांकडून खून केलेला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंटी जहागिरदार हत्या प्रकरणी दोघांना अटक

बेग बंधूंच्या सांगण्यावरून कृत्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बंटी जहागिरदार याच्या हत्येप्रकणातील दोन जणांना पोलीस प्रशासनाने काल रात्री कोपरगाव परिसरातून अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

कृष्णा अरुण शिनगारे (वय 23), रवींद्र गौतम निकाळजे (वय 23) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. 31 डिसेंबर रोजी दुपारी अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्यामुळे, उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले अमिन गुलाब शेख हे जखमी झाले असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103,109,3(5) तसेच आर्म्स अ‍ॅक्ट कलम 3/25 अंतर्गत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथके रवाना करण्यात आली होती. रात्री उशिरा सदर दोन्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल विचारपूस करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, आरोपींनी कोठुन आणली? प्लॅन कसा केला? गुन्ह्यामध्ये अन्य कोणी आरोपी सामील आहेत किंवा नाही, गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय, याबाबींचा पोलीस सखोल तपास करत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, बेग बंधूंच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आल्याचा उल्लेख नगरसेवक रईस अब्दुलगणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

बंटी जहागिरदारची पार्श्वभूमी
अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, भिवंडी तालुका, मनमाड, नेवासा, डेक्कन पो.स्टे पुणे व दहशतवाद विरोधी पथक, मुंबई आदी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे, भारताचा स्फोटक पदार्थ कायदा कलम 3, 4 व 5 सह बेकायदा हालचाली प्रतिबंधक अधिनियम कलम 16 व 18 व दहशतवाद विरोधी पथक, मुंबई गुन्हा रजि. नं. 9/2012 भादंवि कलम 307, 435, 120 (ब), स्फोटक पदार्थ कायदा कलम 3,4,5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध कायदा 1967 चे कलम 16(1)(ब), 18, 20, 23, 38, 39 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम 1999 चे कलम 3(1)(2), 3(2) व 3(4) सह आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. भादंवि कलम. 307, 427, 120 (व), स्फोटक पदार्थ कायदा कलम 3, 4, 5, आर्म अ‍ॅक्ट 3/ 25, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा कलम 10, 13, 16, 18, मोक्का कायदा कलम 3 (1) (2), 3(2), 3(4) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्याला दि.10 जानेवारी 2023 रोजी जामिन मंजूर झालेला होता.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...