श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
चांडगाव येथे शुक्रवारी (दि. 27) रात्री भजन कार्यक्रमानंतर घरात परतलेल्या दाम्पत्यावर अनोळखी चार चोरट्यांनी हल्ला करत घरफोडी केली. या घटनेत पती-पत्नीला गंभीर मारहाण करण्यात आली असून, सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. अलका दत्तात्रय वाघ (रा. चांडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 27 जून रोजी रात्री पावणे नऊ वाजता भजनासाठी तिचे पती दत्तात्रय वाघ गावात गेले होते. रात्री साडे बाराच्या सुमारास ते घरी परतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे कुटुंब झोपी गेले. रात्री 2 ते 2:30 वाजेदरम्यान चार अनोळखी चोरटे लोखंडी ग्रील उचकटून घरात शिरले. त्यांनी घरातील सामान शोधण्याचा प्रयत्न करताना प्रथम दत्तात्रय वाघ यांना लोखंडी कुर्हाडीने व बांबूने मारहाण केली.
पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणार्या अलका वाघ यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घटनेदरम्यान चोरट्यांनी अलका वाघ यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मनीमंगळसूत्र (1 तोळा वजन) आणि डाव्या कानातील 20 हजार रुपये किंमतीचे कर्णफूल (2.5 ग्रॅम वजन) हिसकावून चोरून नेले. एकूण 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. चोरटे अंदाजे 25 ते 30 वयोगटातील असून त्यांनी तोंडाला काळ्या कपड्याने झाकले होते.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत दत्तात्रय वाघ यांना श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अलका वाघ व तिचा मुलगा प्रमोद वाघ यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी गणेश उगले, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदीप शिरसाठ, संदीप आजबे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर निकम करत आहेत.




