अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर तालुक्यातील गावात चोरट्यांकडून भरदिवसा घरफोडून सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली जात आहे. तालुक्यातील पारगाव भातोडी शिवारातील घर दिवसा फोडून सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख 43 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी शनिवारी (30 नोव्हेंबर) नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भैया हबिब शेख (वय 43 रा. पारगाव भातोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेख यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले होते व ते बाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. लोेखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने त्यामध्ये अंगठ्या, मनीमंगळसूत्र, कर्णफुले, पेंडलचे मनीमंगळसूत्र व 20 हजाराची रोकड असा एक लाख 43 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना शेख यांच्या दुपारी तीनच्या सुमारास लक्ष्यात आली. त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस. एस. सरोदे करत आहेत.
दरम्यान, नगर तालुक्यातील गावांमध्ये रात्रीबरोबर दिवसा देखील मोठ्या प्रमाणात चोर्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला जातो मात्र त्या गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. दुसरीकडे वाढत्या चोर्या, घरफोड्या रोखण्यातही पोलीस अपयशी ठरले आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी दिवसा व रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी होत आहे.