अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील यशवंत कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि दोन महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पाच तोळ्यांची सोन्याची चैन, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाईल असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र रायबा चव्हाण (वय 71, रा. यशवंत कॉलनी, साईदीप हॉस्पिटलसमोर, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते 5 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी यांचे भाऊ सुभाष यांनी रात्री झोपताना बेडवरील उशीखाली सोन्याची चैन आणि अंगठी ठेवली होती. तसेच दुसर्या खोलीत दोन मोबाईल ठेवले होते.
अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून फिर्यादीच्या संमतीशिवाय हे साहित्य चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये स्वामी समर्थांचे पेंडंट असलेली पाच तोळ्यांची सोन्याची चैन, पुष्कराज रत्नाचा खडा असलेली दीड तोळ्याची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. या प्रकरणी 6 नोव्हेंबर रोजी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. एम. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश शिंदे तपास करीत आहेत.




