अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील वसंत अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्यांनी दिवसा फोडला. सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 62 हजारांची रोकड असा सुमारे एक लाख 37 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. बुधवारी (4 डिसेंबर) दुपारी 12 ते एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार नारायण गाडे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांची पत्नी सारीका कामाकरिता व मुलगी शाळेसाठी घरातून बाहेर गेल्या होत्या.
तुषार दुपारी 12 वाजता हॉटेलवर कामाकरिता गेले. त्यांनी जाताना फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तसेच लोखंडी सेफ्टी दरवाजा कडीकोयंडा व कुलूप लावून बंद केला होता. दुपारी एक वाजता तुषार यांची मुलगी घरी आली असता तिला कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसून आली. तिने वडिल तुषार यांना माहिती दिली. तुषार यांनी घरात पाहणी केली असता त्यांच्या कपाटातील 10 ग्रॅमची सोन्याची चेन, 10 ग्रॅमचे ब्रेसलेट, पाच ग्रॅमचे कानातले, 1 ग्रॅमची मुरणी, सहा ग्रॅमच्या साखळ्या व तीन ग्रॅमची अंगठी असे सुमारे साडेतीन तोळ्यांचे दागिने आणि 62 हजार रुपयांची रोकड असा एक लाख 37 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. घटनास्थळी तोफखाना पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
सर्जेपुरात किराणा दुकान फोडले
सर्जेपुरा चौकातील हॉटेल मिलिंद समोरील ग्रीन मार्केट नावाचे किराणा दुकान चोरट्यांनी फोडून रोकड व किराणा साहित्य असा नऊ हजारांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 29 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी बुधवारी (4 डिसेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल टिल्लू गायकवाड (वय 42 रा. कॅम्प कॉलनी, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.