अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराच्या मध्यवर्ती भागातील बुरूड गल्ली मध्ये मंगळवारी (2 डिसेंबर) सकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास एका तीन मजली जुन्या इमारतीला भीषण आग लागली. चंगेडिया यांच्या मालकीच्या या हेरिटेज इमारतीत असलेल्या एएस मार्केटिंगचे मोठे गोदाम या आगीत जळून खाक झाले. मनपा आणि सैन्य दलाच्या अग्निशमन वाहनांनी अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी फेरफटका मारणार्या व व्यायाम करणार्या लोकांना या दुकानातून धूर येत असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली.
या परिसरात लाकडी वस्तू व बांबूचा व्यवसाय असल्याने तसेच गोदामात कॅडबरीसह किरकोळ मालाचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र येथे स्फोटासारखा आवाज झाल्याने स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. आगीची प्रचंड तीव्रता पाहून महापालिकेचे अग्निशमन दल सुरूवातीला कमी पडले. त्यांच्या वाहनांमध्ये पुरेसे पाणी नव्हते, तसेच शटर तोडण्यासाठी हातोडे व ब्रेकर यासारख्या अत्यावश्यक साधनांचा अभाव होता, अशी तक्रार नागरिकांनी केली. मनपाची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र होते.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमदार संग्राम जगताप यांनी तात्काळ सैन्य दलातील अग्निशमन वाहनांना पाचारण केले. या दरम्यान महापालिकेच्या बचाव पथकाने (रेस्क्यू पथक) तातडीने आग लागलेल्या इमारतीशेजारील सात ते आठ घरे रिकामी केली. अखेरीस, मनपा आणि सैन्य दलाच्या अग्निशमन वाहनांनी अथक प्रयत्नानंतर याआगीवर नियंत्रण मिळवले. मनपा आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला.





