अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तारकपूर बसस्थानकावरून पुढे प्रवासाला निघालेल्या महिलेच्या बॅगेतील तब्बल दोन लाख रूपये अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गर्दीच्या गोंधळाचा फायदा घेत ही चोरी केल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी शारदा दामु उबाळे (वय 55, रा. उल्हासनगर, सुभाष टेकडी, ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) येथील शेती सन 2022 मध्ये अप्पा गोयकर (रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) या शेतकर्याला विकली होती. त्याबाबतचे पैसे वेळोवेळी घेतले जात होते.
याच व्यवहारातून 2 सप्टेंबर रोजी अप्पा गोयकर यांनी दोन लाख रूपये फिर्यादीच्या पती दामु धोंडीबा उबाळे यांच्याकडे बालमटाकळी येथे दिले. त्यानंतर पती-पत्नी उल्हासनगरला परतण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तारकपूर बसस्थानकात आले. अहिल्यानगर-कल्याण एस.टी. बस सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दी होती. गर्दीत बसमध्ये चढत असताना फिर्यादींच्या बॅगेतील रोकड अज्ञात व्यक्तीने हातोहात चोरून नेली. बस सुटल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पैसे काढण्याचा प्रयत्न करताना चोरीची बाब उघडकीस आली.
या प्रकरणी फिर्यादी शारदा उबाळे यांनी 10 सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात हजेरी लावून फिर्याद दाखल केली. पोलीस अंमलदार तनवीर शेख अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या चोरीमुळे शहरात बसस्थानक सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळेस अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.




