Friday, November 22, 2024
Homeनगरअद्ययावत बसस्थानकासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचे दावे-प्रतिदावे

अद्ययावत बसस्थानकासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचे दावे-प्रतिदावे

श्रीरामपूर बसस्थानकासाठी साडेचौदा कोटी रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अनेक दिवसांपासून पुर्नबांधणीच्या प्रतिक्षेत असलेल्या श्रीरामपूर बस स्थानकासाठी 14 कोटी 50 लाख 49 हजार 840 रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. याचे कामही लवकरच सुरुही होईल, परंतु या कामासाठी आम्हीच प्रयत्न केले असल्याचे दावे-प्रतिदावे होऊ लागले आहे. आ. लहू कानडे यांनी श्रीरामपूर बसस्थानकासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्न उपस्थित करुन शासनाचे लक्ष याकडे वेधले होते. तसेच नंतरच्या काळातही त्यांनी या मागणीसाठी मंत्रालयामध्ये सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी देऊन आपल्या प्रयत्नाला यश येऊन या निधीस मंजुरी मिळाल्याचे आ. कानडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक व आगार यांच्या पुर्नबांधणीसाठी 14 कोटी 50 लाख 49 हजार 840 रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी दिली. आपल्या प्रयत्नातूनच व पाठपुरावाने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सहकार्याने हा निधी मिळाला असल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले. आपण श्रीरामपूर बसस्थानकाच्या पुर्नबांधणीसाठी तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांना 4 फेब्रुवारी 2020 रोजी पत्र दिले होते. स्व. खासदार गोविंदराव आदिक हे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना श्रीरामपूर येथे एमआयडीसीमध्ये एसटीची कार्यशाळा आणली होती. आपण आता नवीन बसस्थानक उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर येथील बसस्थानक व आगार यांच्या पुर्नबांधणीसाठी महायुती सरकारने 14 कोटी 50 लाख 49 हजार 840 रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असल्याची माहिती प्रशांत सदाशिव लोखंडे यांनी दिली. याबाबत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी महायुती सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत अतिशय जुनी होऊन मोडकळीस झाली होती. याबाबत महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी पत्र देऊन भेट घेत वस्तुस्थिती सांगितली होती, असे प्रशांत लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या