अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने फौजदारी खटल्यात महत्त्वपूर्ण निकाल देत दोन उद्योजक भावंडांना एक वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच 32 लाख 96 हजार 369 रूपये इतकी नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. सदर खटला पुष्कराज एंटरप्रायझेस यांनी दाखल केला होता. या प्रकरणात सुपा येथील कल्पक स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व तिचे मालक सतीश माणिकराव झेंडे आणि सुहास माणिकराव झेंडे यांना शिक्षा झाली आहे.
सुपा येथील कल्पक स्टील्स प्रा. लि. ही कंपनी सतीश झेंडे व सुहास झेंडे यांच्या मालकीची आहे. कंपनीसाठी आवश्यक कच्चा माल उधारीवर घेण्यात आला होता. त्या बदल्यात देय रक्कम भागविण्यासाठी आरोपींनी त्यांच्या कंपनीचे तीन धनादेश (चेक) एकूण 28 लाख 47 हजार 835 रूपये रकमेचे फिर्यादी पुष्कराज एंटरप्रायझेस यांना दिले होते. फिर्यादींनी संबंधित धनादेश बँकेत सादर केले असता ते वटले नाहीत व परत आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम 138 अंतर्गत 18 सप्टेंबर 2024 रोजी फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल केली. खटल्यादरम्यान पुष्कराज इंटरप्रायझेसचे मालक विजय रतनलाल झंवर यांनी न्यायालयात साक्ष देत आरोपींनी उधारीवर माल खरेदी केल्याचे व त्याबाबतची कागदपत्रे सादर केली.
आरोपींकडून तक्रारदारासोबत कोणताही व्यवहार झालेला नसल्याचा बचाव मांडण्यात आला. मात्र, जर कोणताही व्यवहार झाला नव्हता, तर संबंधित धनादेश तक्रारदाराकडे कसे आले याबाबत आरोपी समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. तसेच तक्रारदाराने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचा कोणताही ठोस पुरावा आरोपींकडून सादर करण्यात आला नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टनुसार देण्यात आलेल्या वैधानिक नोटीसीलाही आरोपींनी उत्तर दिले नसल्याने न्यायालयाने तक्रारदाराच्या दाव्यात तथ्य असल्याचा निष्कर्ष नोंदविला. दोन्ही पक्षांचे पुरावे व उलटतपासणी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली. या खटल्यात फिर्यादींच्या वतीने अॅड. श्याम असावा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. सोमेश पालीवाल व अॅड. प्रांजल यांनी सहकार्य केले.





