अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकावून दरमहा एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अखिल भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकार्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) असे अटकेत घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
9 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील सुयश मेटल प्रोसेसिंग्स प्रा. लि. या कंपनीत उनवणे, राजेश पाटील व अन्य चार अनोळखी इसमांनी बेकायदेशीर प्रवेश केला. कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करून कंपनीचे काम बंद पाडण्यात आले. काम सुरू ठेवायचे असल्यास दरमहा एक लाख रूपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारू, अशी धमकी देत आरोपींनी व्यवस्थापकाकडून जबरदस्तीने 20 हजार रूपये उकळल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात उनवणे व त्याच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. उनवणे याच्याविरूध्द यापूर्वीही तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण आदी प्रकारांशी संबंधित गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कामगारांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणीही उद्योगधंद्यांना किंवा कामगारांना त्रास देत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारांना कठोर कारवाई करून उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





