Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेख...पण मला एका मुलीचा बाप कर!

…पण मला एका मुलीचा बाप कर!

‘पुण्यही माझे विधात्या पाप कर
पण मला एका मुलीचा बाप कर’
ही युवा कवी गोपाल मापारी यांची कविता. कवीने काव्यातून व्यक्त केलेल्या उदात्त भावना समाजाच्याही अनुभवास येऊ लागल्या आहेत. सध्याच्या आधुनिक युगातही मुलगी नकोशीच मानली जाते. भारतात दोन कोटींपेक्षा जास्त मुली नकोशा असल्याचे सांगितले जाते. मुलालाच वंशाचा दिवा मानले जाते. पोटी मुलगाच यावा अशीच महिलांची सुद्धा सार्वत्रिक भावना आढळते. गर्भवती महिलेचे डोहाळजेवण करण्याची प्रथा आहे. डोहाळजेवणाच्या दिवशी ‘पेढा की बर्फी’ असा खेळ खेळला जातो. या खेळातही गर्भवती महिलेने बर्फीला हात लावला तर तिच्या घरच्यांचे चेहरे उतरल्याचा अनुभव कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना येतो. चार घटका करमणुकीसाठी खेळला गेलेला हा खेळ आहे याचाही विसर त्यांना त्यावेळी पडतो. मनात खोल रुजलेला संस्कार त्या विनोदी खेळातही सहज व्यक्त होतोच. या पार्श्वभूमीवर मुलगी झाल्याचा पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद होणे आणि त्यांनी तो सामाजिक पद्धतीने साजरा करण्याचे प्रसंग विरळाच. पहिला प्रसंग शेल पिंपळगाव इथला. हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक लहानसे गाव. या गावातील झरेकर कुटुंबात नुकतीच एक मुलगी जन्माला आली. त्या बाळाला हेलिकॉप्टरमधून घरी नेण्यात आले. कुटुंबात पहिलीच मुलगी जन्माला आल्याचा आनंद आम्ही साजरा केला अशी भावना बाळाच्या आईवडिलांनी माध्यमांकडे व्यक्त केली. दुसरी घटना सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द येथील. गावात लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली. तिलाही त्यांनी हेलिकॉप्टरमधुनच घरी आणली. चिमुकलीच्या स्वागतासाठी घराबाहेर कमान उभारली. तिला हंड्या-झुंबरे टांगली. सांगली जिल्ह्यातीलच वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीने यापुढचे पाऊल टाकले आहे. चिमुकलीच्या स्वागताच्या दृष्टीकोनाचा परीघ विस्तारणारा निर्णय घेऊन तो अंमलात देखील आणला आहे. या गावात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीच्या नावे एक हजार रुपयांची ठेव ठेवली जाते. आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त मुलींच्या पालकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जळगाव शहरातील पाटील कुटुंबियांनी देखील समाजासमोर आदर्श उभा केला. त्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले दुसरे बाळही मुलगीच आहे हे विशेष. या बाळाला घरी आणताना तिच्या वडिलांनी परिसरातील प्रत्येक घरात जिलेबीचे वाटप केले. असे प्रसंग विरळाच असले तरी समाज बदलतो आहे, तरुण मातापित्यांची मानसिकता बदलत आहे याच्या या पाऊलखुणा मानायला हव्या. अंधारात मार्ग दाखवायला एक पणती पुरेशी असते. तिच्या मिणमिणत्या उजेडात माणसाला पुढचे पाऊल टाकायला बळ देण्याची ताकद असते. यामुळे मुलगी हवीशी वाटण्याची भावना कदाचित अनेक लोकांमध्ये निर्माण होऊ शकेल. निदान मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकेल. मुलीच्या आगमनाचा सोहळा करण्याची ही बाब कौतुकास्पद आहे. तथापि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची ताकद ज्यांच्याकडे नाही त्यांनीही ठरवले तर तेही ‘मुलगी झाली हो’ याचा अभिमान मिरवू शकतील. बैलगाडीतुन, दमणीमधून, सजवलेल्या रिक्षामधून देखील ती मुलीचे स्वागत करु शकतील. त्याबद्दलच्या बातम्या छापण्याचे औदार्य कदाचित माध्यमांना मानवणार नाही तथापि बदल घडायलाच हवा. लोकही बरेच काही करु शकतील. मुलगीच जन्माला घातल्याचा सगळा दोष तिच्या आईच्या माथी मारणे बंद करु शकतील. मुलगी असलेल्या नवजात अर्भकाच्या गळ्याला नख न लावता तिला आनंदाने घरी नेतील. मुलगीच झाली अशी भावना तिच्या आईच्या मनात कधीही निर्माण होऊ नये आणि एखादीवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घेऊ शकतील. हे देखील मुलीचे स्वागत करणेच आहे. सामाजिक दृष्टीकोन म्हणता येईल तो अशा छोट्या छोट्या घटनांमधून व्यक्त होत राहिला तरच मुलीचा जन्म हा सुद्धा आनंददायक ठरु शकेल, नव्हे तो त्या दृष्टीकोनानेच समाजाकडून स्वीकारला जायला हवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या