कर्जत |प्रतिनिधी| Karjat
विहिरीच्या खोदकामासाठी आलेल्या मायलेकींचा ट्रॅक्टर कालव्याच्या चारीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 25) सकाळी साडेआठच्या सुमारास माहिजळगाव शिवारातील वाघमारे वस्ती परिसरात घडली. वाघमारे वस्ती परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू होते. यावेळी करिश्मा जाधव ट्रॅक्टर चालवत होत्या. त्यांची मुलगी अर्चना ट्रॅक्टरमध्ये बसलेली होती.
ट्रॅक्टर रिव्हर्स घेताना ताबा सुटल्याने तो शेजारील कालव्याच्या चारीत कोसळला. या दुर्घटनेत करिश्मा आणि अर्चना या दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जझाडं यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पुढील कार्यवाही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले. बीड जिल्ह्यातील नाथापूर येथील रहिवासी असलेल्या मायलेकींच्या दुर्दैवी मृत्यूने माहिजळगाव आणि नाथापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




