पुणे | प्रतिनिधी Pune
पुण्यातील बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या आयशर टेम्पोने बसची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यालाच चिरडले. आधी कारला जोरदार धडक देणारा टेम्पो नियंत्रण सुटल्याने थेट विद्यार्थ्यांमध्ये घुसला. या भीषण अपघातात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर बुधवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने परिसर हादरून गेला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिद्धेश राजे याला ऊग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रतीक माऊती चव्हाण (वय 22, रा. घुलेश्वर, माळशिरस, ता. पुरंदर) या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. भरदुपारी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थी आणि नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने आयशर टेम्पो (एमएच 04 एफडी 7654) भरधाव वेगाने येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसथांब्याजवळ ट्रिनिटी कॉलेजचे 20 ते 25 विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बसथांब्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर वाहतूक संथ होती. त्याचवेळी घाटाच्या उतारावरून वेगाने आलेल्या टेम्पोने पुढे चाललेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
अनियंत्रित झालेला टेम्पो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या बसथांब्याकडे गेला आणि तेथे बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्मयात घुसला. अचानक टेम्पो अंगावर आल्याने विद्यार्थ्यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. टेम्पोच्या जोरदार धडकेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वेगवेगळ्या ऊग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील तिघांचा मृत्यू झाला. येवलेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टेम्पोचालक ताब्यात
अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोचा वेग, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, तसेच अपघाताच्या वेळी वाहनाची स्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
बोपदेव घाटाकडून येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना धडकला. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. टेम्पोचालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मारूती पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस ठाणे.




