नाशिक । वृत्तसंस्था Nashik
आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी, जबाबदाऱ्या आणि समन्वय यांचा आढावा घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आज ‘सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी विविध विभागांच्या पूर्वतयारीचे नियोजन व आराखडा’ या विषयावर आंतरविभागीय बैठक पार पडली.
या बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह तहसीलदार कुंभमेळा मकरंद दिवाकर, विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, नाशिक महानगरपालिका व पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आणि सल्लागार उपस्थित होते.
बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितींचा विचार करून प्रत्येक विभागाने करावयाच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये विभागनिहाय नियम व जबाबदाऱ्या निश्चित करणे, संघटनात्मक रचना, संभाव्य धोक्यांचे निराकरण व जोखीम कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आकस्मिक कृती आराखडे, आपत्तीनंतर पूर्ववत स्थिती निर्माण करण्यासाठीचे नियोजन, उपलब्ध साधनसामग्रीची माहिती आणि मनुष्यबळाचे नियोजन व तैनाती या महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय विविध विभागांसाठी प्रमाणित कार्यपद्धती, संवाद व माहिती प्रसारण आराखडा, आपत्कालीन संपर्क निर्देशिका, घटनांची नोंद व अहवाल सादर करण्याची प्रक्रिया, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, प्रात्यक्षिके व सराव, तसेच विविध विभागांमधील परस्पर सहकार्य व मदत व्यवस्था याबाबतही चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी करावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक पूर्वतयारीची माहिती घेण्यात आली.
यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना येत्या १५ डिसेंबरपर्यंत आपापल्या विभागाचा स्वतंत्र कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र बैठका घेऊन विभागाच्या जबाबदाऱ्या, उपलब्ध साधनसंपत्ती, आवश्यक मनुष्यबळ, संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांचे सविस्तर नियोजन करावे, असे देखील सांगितले.
सिंहस्थ महाकुंभमेळ्यासारख्या मोठ्या जनसमुदायाच्या एकत्रीकरणाच्या काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती उद्भवण्यापूर्वीच संभाव्य धोके ओळखून सज्ज राहणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करून त्यानुसार ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातूनच प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभी राहू शकते. त्यामुळे विभागनिहाय बैठका घेऊन आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, संपर्क व्यवस्था आणि कार्यपद्धती यांची पूर्वतयारी पूर्ण करावी, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी अधोरेखित केले.
तसेच, विभागनिहाय कृती आराखडा तयार करताना स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा आणि पाण्याची गुणवत्ता, वीजपुरवठा, मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता व सुरक्षा व्यवस्था, दैनंदिन प्रशासकीय गरजा अशा सर्वंकश बाबींचा विचार करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याशिवाय भाविकांना भेडसावू शकणाऱ्या गैरसोयी, उपलब्ध संसाधनांमधील संभाव्य कमतरता, आवश्यक सेवांमध्ये उद्भवू शकणारे व्यत्यय आणि त्यांचा परिणाम कमीत कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही कृती आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.




