हिंगोली | Hingoli
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सापडले आहेत. आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर केलेल्या एका कृतीमुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. इतकेच नाही तर त्यांनी केलेल्या कृतीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा संतापले असून त्यांनी बांगर यांना खडेबोल सुनावले आहे.
आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येत असून याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीने जोर धरलेला असतानाच आता निवडणुक गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक प्रकरण काय आहे?
हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मात्र मतदान केंद्रातील त्यांच्या वागणुकीमुळे वादाला तोंड फुटले आहे. कारण, बांगर यांनी मतदान केंद्रातच महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटन दाबताना मार्गदर्शन केले. तसेच “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, अशी घोषणाबाजी मतदान केंद्रातच केली. याचदरम्यान मोबाइल फोनचा वापरही त्यांनी केला.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाइल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे या प्रकरणावर संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, याबाबत अहवाल मागवण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती. आता या प्रकरणात आमदार संतोष बांगरांना मोठा झटका बसलाय. संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फडणवीसांनी बांगर यांना फटकारले
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा फडणवीसांनी आमदार बांगर यांच्यावर संताप व्यक्त करत म्हटले की, किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसे वागतोय, आपण कोणता संदेश देत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी बांगर यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




