Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे पुन्हा तांदळाचा ट्रक पकडला

नंदुरबार येथे पुन्हा तांदळाचा ट्रक पकडला

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

शहरातील निलेश लॉन्सजवळ आज पुन्हा तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला असून सदर माल कोठून कुठे जात होता याबाबत मात्र माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. चार दिवसात हा दुसरा ट्रक पकडण्यात आला आहे. मात्र, अद्याप पुरवठा विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे विशेष आहे.

- Advertisement -

दोंडाईच्याकडून नंदुरबारमार्गे ट्रक (क्र.एम.एच.20 ईजी 9146) यामधून तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन काही नागरिकांनी सदर वाहन शहर निलेश लॉन्सजवळ अडविले. त्यात तांदूळ असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांशी संपर्क साधून सदरचे वाहन शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहे. औरंगाबादकडून सदरचे वाहन गुजरात राज्यात जाणार असल्याचे समजते. चार दिवसात दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. मात्र याबाबत पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दि.13 रोजी वाहन (क्र.एमएच.23 डब्ल्यू 5481) दोंडाईचाकडूनच नंदुरबारकडे येत असतांना निलेश लॉन्सजवळच पकडण्यात आले असून शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दि.2 मे रोजी शहादा तालुक्यातून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 1 लाख 546 किलो तांदूळ पोलिसांनी जप्त केला होता. यावेळी तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक करणार्‍यांकडून पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

टाळेबंदी कालावधीत रेशनिंगच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.

मात्र, तरीही नंदुरबारमार्गे मोठ्या प्रमाणावर तांदळाची वाहतूक होत आहे. यामुळे सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जातो की इतर दुसरीकडे? याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. शहर पोलिस ठाण्याच्या आवारात चार दिवसांपासून जप्त करण्यात आलेल्या ट्रक (क्र.एम.एच.23 डब्ल्यू 5481) मध्ये 620 तांदळाच्या गोण्या आहेत. मात्र पुरवठा विभागाकडून अद्यापही कार्यवाही करण्यात येत नसल्याने त्यांच्या भुमिकेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या