Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यासिग्नलवरील 'सीसीटीव्ही' कॅमेरे कार्यान्वित; बेशिस्त वाहनचालकांवर राहणार नजर

सिग्नलवरील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कार्यान्वित; बेशिस्त वाहनचालकांवर राहणार नजर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील वाहतुकीला शिस्त मिळावी तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन व्हावे, या दृष्टीने स्मार्ट सिटी तसेच शहर पोलीस दलाच्या वतीने शहरातील विविध चौकांमध्ये 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त सीसीटीव्ही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान लवकरच अधिकारी व सेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येऊन सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच कायदा भंग करणार्‍यांना इ-चलनाद्वारे दंड करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग डॉ. प्रशांत बच्छाव यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात बसविण्यात आलेल्या 40 सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवणे शक्य होईल. तसेच, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तत्काळ मार्ग काढणे सोपे होणार आहे. तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही पोलीस उपायुक्त डॉ. बच्छाव यांनी केले आहे.वाहतूक सिग्नलवर लाल दिवा असताना वाहनचालकाने हिरवा दिवा सुरू होईपर्यंत थांबणे आवश्यक आहे.

सिग्नलवरचे पांढरे झेब्रा पट्ट्यांमागे वाहने थांबविली पाहिजे, अनेक वाहतूक नियम असताना बेशिस्त वाहनचालक मात्र बिनधास्तपणे या नियमांचा भंग करतात. तर दुसरीकडे सिग्नल ही तोडून स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. मात्र आता सावधान होउन वाहन चालवावे लागेल तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे कारण शहरातील जवळपास 40 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान शहरातील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडली असून त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशोक स्तंभकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणार्‍या चौफुलीवर सिग्नल यंत्रणात बिघाड झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे देखील आज पाहायला मिळाले. त्यामुळे स्मार्ट सिटीसह वाहतूक पोलिसांनी याकडे देखील लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या