नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह ६ पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. सरकार यासाठी ८७,६५७ कोटी रुपये खर्च करणार आहे. रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गव्हू, हरभरा, मसूर, मोहरी, जव आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केलीय. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे ८० कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, गहू, मोहरी, हरभरा यांच्या आधारभूत किंमतीत अनुक्रमे १५० रुपये, ३०० रुपये आणि २१० रुपये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि विशेषत: आगामी रब्बी हंगामात शेतपिकांच्या उत्पन्नाला आधार देण्याच्या उद्देशाने पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी मूल्य आणि किंमत आयोगाकडून (CACP) दरवर्षी पेरणीच्याआधी २२ पिकांसाठी एमएसपीची शिफारस केली जाते. यात १४ खरीप पिके आणि ७ रब्बी पिकांचा समावेश असतो. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.
- गहू – १५० रुपयाची वाढ आता २ हजार ४७५ रूपये क्विंटल हमीभाव असणार
- मोहरीच्या किंमतीत – ३०० रुपयांची वाढ, आता ५ हजार ९५० रूपये क्विंटल हमीभाव असणार
- जवसाच्या किंमतीत १३० रुपयांची वाढ आता १ हजार ९८० रूपये क्विंटल हमीभाव असणार
- हरभऱ्याची किंमतीत – २१० रुपयाची वाढ होऊन ५ हजार ६५० रूपये क्विंटल हमीभाव असणार
- मसूराच्या किंमतीत २७५ रुपयांची वाढ होऊन आता ६ हजार ७०० रूपये क्विंटल हमीभाव असणार
- करडईच्या किंमतीत १४० रुपयाची वाढ होऊन आता ५ हजार ९४० रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा