अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केंद्रामध्ये तिसर्यांदा मंत्रीपदाची जरी संधी दिली असली तरी दुसरीकडे मात्र आरपीआय पक्षाला महाराष्ट्रामध्ये विचारात घेतले जात नाही. शासकीय कार्यक्रमांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवित नाही. महायुतीत आरपीआय महत्वाचा घटक पक्ष आहे. मात्र, आमच्या पक्षाला सापत्न वागणूक मिळत आहे. आगामी विधानसभेच्या 18 ते 20 जागांची मागणी करणार असल्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे नगर जिल्हा दौर्यावर आले होते. त्यावेळेस नगरच्या शासकीय विश्रामगृहावर ते बोलत होते. पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आदी उपस्थित होते. मंत्री आठवले म्हणाले, राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व तुम्हाला मंत्रिपद दिले जाईल, असे सांगितले. मात्र, दोन वर्षे उलटून गेले तरीही अजून विस्तार झाला नाही, हा एकप्रकारे हा अपमान आहे. आम्हाला अपमान पचवण्याची सवय आहे, तरी आम्ही महायुतीबरोबर आहोत आणि महायुतीमध्येच राहणार आहोत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरपीआय हा महत्वाचा घटक पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 18 ते 20 जागा मिळाल्या पाहिजे, अशी पक्षाची भूमिका राहिल.
राजकोट (मालवण) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेला मी स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे. हवेमुळे तो पडला यावर आपला विश्वास नाही, हवा एवढी नव्हती. चक्रीवादळ पण नव्हते. चुकीच्या माणसाला काम दिल्यामुळे त्याचा आपल्याला हा फटका बसलेला आहे. देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पकार आहेत. ज्यांना मोठ्या कामाचा अनुभव आहे, त्यांनाच हे काम दिले असते तर अशी वेळ आली नसती. आता याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला गेला पाहिजे. सरकारने याबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुतळ्याच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये सत्ताधारी, विरोधकांची व तज्ञ लोकांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी आपण येत्या एक दोन दिवसांमध्ये करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जातनिहाय जनगणनेला पाठींबा
जातनिहाय जनगणनाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णय दिलेला आहे. वास्तविक 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते, पण ती झालेली नाही. ती व्हावी ही अशी अपेक्षा आहे. एसी व एसटी वर्गाची पण त्याचबरोबर गणना करावी. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभा केला आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी मान्य नाही. तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाचा विषय घेतला गेला पाहिजे. मराठा समाजासाठी एक वेगळी ओबीसी वर्गवारी करावी, जेणेकरून त्याचा लाभ त्या समाजाला मिळेल, असे मंत्री आठवले यांनी सांगितले.
श्रीरामपूर मतदारसंघावर दावा
लोकसभा निवडणुकीत मागणी करुनही शिर्डीची आरपीआयला दिली नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूरची जागा देण्यात यावी. यापूर्वी आमच्या पक्षाने ही लढवली होती. त्यावेळी चांगली मते मिळलेली आहेत. त्यामुळे या जागेचा आग्रह महायुतीकडे करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.