अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सावेडी उपनगरात एकाच दिवशी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणार्याला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. परवेझ जावेद मणियार (रा. नाशिक) असे जेरबंद केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याने चोरीचे सोने नाशिकमधील एका सराफाला विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्या सराफाकडून एक लाख 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. सुजाता राहुल अष्टेकर (रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) या पाईपलाईन रस्त्यावरून पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याचे गंठण बळजबरीने हिसकावले होते.
याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच अंजली अनिल धोपडकर (रा. भुतकरवाडी) या 26 जुलै रोजी देवदर्शन करून घरी जात असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तोफखाना पोलीस करत असताना सदरचा गुन्हा नाशिक येथील परवेझ जावेद मणियार याने केला असल्याचे निष्पन्न झाले. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने चोरीचे सोने नाशिक येथील सराफाला विक्री केले होते. ते सोने पोलिसांनी सराफाकडून हस्तगत केले आहे.
पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुरज वाबळे, संदीप धामणे, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे, राहुल म्हस्के, चेतन मोहिते यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.