अहिल्यानगर | Ahilyanagar
नेवासा तालुक्यातील चांदा येथील शाहिद राजमहंमद शेख याची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणातील एका आरोपीस नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाभळेश्वर येथून अटक केली.
याबाबत माहिती अशी की, शाहिद राजमहंमद शेख याचे सुरज लतिफ शेख व अक्षय बाळू जाधव यांचेशी वाद होवुन आरोपी यांनी शाहिद शेख याचे छातीमध्ये गावठी कट्टयातुन फायर करुन त्याची हत्या केली. यासीन इब्राहिम शेख (रा. चांदा) यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात खून व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके तयार करुन रवाना करण्यात आलेली होती. 13 जानेवारी रोजी आरोपी सुरज शेख हा बाभळेश्वर, ता. राहाता परिसरामध्ये लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने तिथे जावून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नाव सुरज लतीफ शेख (वय 24) रा. चांदा असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार अक्षय बाळू जाधव व सुरज कैलास उबाळे (दोघेही फरार) अशांनी मिळून शाहिद राजमहंमद शेख यास आर्थीक व्यवहार व वादाचे कारणावरुन गावठी कट्ट्यामधून फायर करुन खून केल्याची कबुली दिली. आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक दीपक मेढे, महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विजय पवार, गणेश लोंढे, फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी केली.
रात्री उशिरा चांद्यात दफनविधी
चांदा |वार्ताहर| Chanda
शाहिद शेखची हत्या करणार्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्या अशी मागणी करत शाहिद शेखच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका बसस्टँड वरच अडवत ठिय्या मांडला. आरोपींना तातडीने अटक केली जाईल असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतरच रुग्णवाहिका शाहिदचा मृतदेह घेऊन त्याच्या घराजवळ आणली.
शाहीदचा मृतदेह अहिल्यानगरच्या रुग्णालयातून संंभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा रुग्णवाहिका चांद्यात पोहोचली. मात्र शाहीदच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चांदा बस स्थानकावरच थांबवली व त्याच ठिकाणी यासीन शेख, शादाब शेख, रिजवान शेख, नावेद शेख, रियाज शेख, आसत कुरेशी, इस्माईल शेख आदींसह अनेक नातेवाईकांनी जोपर्यंत शाहिदची हत्या करणार्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा घेतला.
मात्र त्या ठिकाणी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, शनिशिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तत्परता दाखवत आरोपींना ताबडतोब अटक केली जाईल. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. असे आश्वासन शाहीदच्या नातेवाईकांना दिल्याने ते शांत झाले. आणि रुग्णवाहिका शाहिदच्या घरी नेऊन तेथून रात्री उशिरा मुस्लिम स्मशानभूमीत शाहीदचा दफनविधी करण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोनई व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गावठी कट्ट्यांचा शोध घ्या : सरपंच दहातोंडे
चांदा परिसरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. मात्र कारवाई होत नाही. परिसरात गावठी कट्टे असल्याचा संशय असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. गावठी कट्ट्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी.




