Thursday, May 2, 2024
Homeनगरचांद्यात लसीकरणासाठी पहाटे पाचपासूनच गर्दी

चांद्यात लसीकरणासाठी पहाटे पाचपासूनच गर्दी

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंध लसीकरणासाठी पहाटे पाचपासूनच रांगा लागत असल्याने आणि त्यातच आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आरोग्य प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच भर म्हणजे या ठिकाणी लसीकरणासाठी लसींची संख्याही मर्यादित भेटत असल्याने आरोग्य प्रशासनाला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

सध्या चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षांवरील नागरिकांना कोवीड प्रतिबंधक लस दिली जात आहे. चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत एकूण सोळा गावे आणि सहा उपकेंद्र येतात. मात्र या सर्व गावांसाठी चांदा आरोग्य केंद्रातच लसीकरण असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.. त्यातच भर म्हणजे वरूनच लसही रोज उपलब्ध होत नाही. त्यामुळे लस कधी येणार ह्या चौकशीसाठीही आबालवृध्द रोजच चकरा मारतात.

प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्याही अपुरी असल्याने आलेल्या गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी मोठी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे. बाहेरगावाहून पहाटे पाच वाचल्यापासूनच नागरीक येथे आपला नंबर लवकर लागावा यासाठी येत आहेत. नंबरसाठी वृध्द, महिलाही पहाटेपासून रांगेत उभे राहत आहेत. परंतु लसीची संख्या मर्यादित असल्याने अनेकांना कित्येक तास थांबून पुन्हा मागे जावे लागते.

पुन्हा दुसर्‍या दिवशी लसीकरणासाठी हे नागरीक पहाटेच विना अन्नपाण्याचे नंबरसाठी येत आहेत. एकतर शासनाने मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध करून रोज लसीकरण सुरू ठेवावे किंवा प्रत्येक उपकेंद्रात प्रत्येक गावागावात लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणार्‍या गावातील नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा जास्त गर्दीमुळे कोवीड 19 चा धोका जास्त असतो. एकीकडे ‘ब्रेक दी चेन’साठी लॉकडाऊन असताना दुसरीकडे मात्र प्रतिबंधीत लसीसाठीच गर्दी होत असल्याने मोठी धोक्याची घंटा आहे. आरोग्य खात्याने यात लक्ष घालून लसीकरण मोहीमेला वेग द्यावा अशी मागणी होत आहे.

सध्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक येत आहेत. मात्र लसीकरण सकाळी दहा वाजता चालू होत असल्याने नागरीकांनी खूप लवकर केंद्रात येऊ नये. गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. गर्दी होऊ नये त्यासाठी सोनई पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. लसींची उपलब्धता जास्त प्रमाणात झाल्यानंतर उपकेंद्रातही लसीकरणाचे नियोजन करण्याचे धोरण आहे. जसजशी लस उपलब्ध होईल तसे सर्वांचे लसीकरण होणार आहे. आम्ही चोवीस तास आपल्यासाठी काम करायला तयार आहोत त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मात्र नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. तोंडाला मास्क, सोशल डिस्टंन्सचे केंद्राच्या आवारात आल्यानंतर पालन करावे.

-डॉ. संतोष मोरे वैद्यकीय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या