Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयChandrhar Patil : "मला ऑफर आहे, पण..."; शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत काय म्हणाले...

Chandrhar Patil : “मला ऑफर आहे, पण…”; शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत काय म्हणाले चंद्रहार पाटील?

मुंबई । Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना आता पश्चिम महाराष्ट्रात नवा आयाम मिळाला आहे. सांगलीतील ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करत ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. “हा प्रवेश थांबवून दाखवा,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. मात्र, या गदारोळात चंद्रहार पाटील यांनी स्वतः सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतली नाही, शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही, सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन.” असे पाटील यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

YouTube video player

गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना अचानक उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांची कोंडी झाली होती. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाटील यांची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु, खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांच्याच बाजूने आग्रह धरला. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.

लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटाशी जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या. २६ एप्रिल रोजी त्यांनी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने झाल्याचे सांगितले जाते. तसेच, काही दिवसांपूर्वी पाटील यांनी उदय सामंत यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी “मी पक्षासोबतच आहे, केवळ काही कामानिमित्त भेटलो,” असे स्पष्टीकरण दिले होते.

चंद्रहार पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाने सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या ट्विटनुसार, ते सध्या बाहेरगावी असून, सहकाऱ्यांशी सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय घेणार आहेत. पाटील यांच्या या अनिश्चित भूमिकेमुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा शिवसेना ठाकरे गटाचा महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत चंद्रहार पाटील यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याचा संभाव्य पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. दुसरीकडे, शिंदे गट स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक पावले उचलत आहे. पाटील यांचा प्रवेश शिंदे गटासाठी सांगलीत मोठी संधी ठरू शकते.

चंद्रहार पाटील यांचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयामुळे सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय डावपेच कशा पद्धतीने पुढे सरकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

 

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...