मुंबई | Mumbai –
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलन करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अध्यादेश काढला तर
आंदोलन होणार नाही असे म्हटले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही, असा चंद्रकांत पाटील यांनी विचारला. आता अध्यादेश काढणं म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही. सलग 15 वर्षात राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. यावर मतदान झालं, पण त्यात फेटाळण्यात आलं. 15 वर्षात मराठा आरक्षण दिलं नाही. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर घाईघाईने विधानसभा निवडणुकीआधी राणे समितीच्या आधारावर आरक्षण दिलं. ते कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा तुमची कधीच नव्हती. जर होती तर याआधी द्यायला हवं होतं. आता भाजपने दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे.
या प्रकरणात केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नव्हती. केंद्र सरकार पार्टी नव्हती. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, पण सरकारने काय पूर्वतयारी केली? असा प्रश्न विचारत वकिलांमध्ये समन्वय नव्हता, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. आता फसवणूक थांबवा, अध्यादेशात वेळ जातो. 10 टक्के आरक्षणाला हे पात्र आहेत, अशा आशयाचं सर्क्युलर ताबडतोब काढा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.